एक्स्चेंज ऑफर, डाऊन पेमेंटसारख्या सवलती देऊनही वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनचा फटका देशातील वाहन उत्पादकांना बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. खरेदीअभावी मारुती, महिंद्रसारख्या आघाडीच्या कंपन्यांना सरलेल्या जून महिन्यात वाहन विक्रीत घटीला सामोरे जावे लागले. त्या तुलनेत ह्य़ुंदाई, होन्डा, फोर्डसारख्या विदेशी कंपन्यांनी वाढ नोंदविली आहे. अर्थव्यवस्थेच्या संथ प्रवासामुळे वाहन उद्योगाने सलग आठव्या महिन्यात घसरणीचा क्रम कायम राखला आहे.
एरव्ही पावसाळ्यात संथ होणाऱ्या वाहन विक्रीचा अंदाज घेऊन अनेक कंपन्यांनी जूनच्या सुरुवातीपासून सवलतींचा भडिमार सुरू केला. मात्र त्याचा वाहन खरेदीदारांवर फारसा परिणाम झाला नसल्याचे गेल्या महिन्यातील एकूण विक्रीच्या आकडय़ावरून दिसून येते. प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ नाहीच, तर औद्योगिक मंदीचा फटका अवजड व्यापारी वाहनांच्या विक्रीलाही बसला आहे. तर लोकप्रिय एसयूव्ही वाहन श्रेणीनेही यंदा दुहेरी आकडय़ाची घट राखली आहे. दुचाकी वाहन विक्रीचेही तसेच काहीसे आहे. ट्रॅक्टर विक्रीला मात्र पावसाची अपेक्षित जोड मिळाली आहे,
अग्रणी मारुती सुझुकीने यंदा गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या ७.८ टक्के कमी वाहन विक्री नोंदविली. एरवी महिन्याला लाखाची विक्री नोंदविणाऱ्या मारुतीने यंदा ७७ हजार वाहने विकली आहेत. विक्रेत्यांकडे वाहनांचा पुरेसा साठा असल्याने मारुतीने याच महिन्यात पाच दिवस उत्पादन घेतले नव्हते. महिंद्रसह टाटा मोटर्सलाही यंदा घसरण नोंदवावी लागली आहे.
टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची विक्री ३१.५४ टक्क्यांनी घसरून अवघ्या ११,८०४ वर आली आहे, तर महिंद्रची विक्री ७.०४ टक्क्यांनी कमी होत ३६,२०७ पर्यंत रोडावली आहे. महागडी एसयूव्ही वगळता इतर वाहनांच्या किंमतवाढीची घोषणा महिंद्र समूहाने तातडीने अमलात आणली आहे. शेव्हर्ले नाममुद्रा असलेल्या जनरल मोटर्सनेही यंदा १०.७१ टक्के वाहन विक्री घट राखली आहे. टोयोटालाही याच परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागला आहे.
छोटय़ा प्रवासी वाहननिर्मिती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या होन्डा, रेनो, फोर्ड यांनी मात्र चांगली कामगिरी बजाविली आहे. होन्डाची गेल्या महिन्यात तिप्पट वाढ झाली आहे, तर फोर्डनेही जूनमध्ये २० टक्के अधिक वाहन विक्री नोंदविली आहे. या क्षेत्रातील पूर्वीपासूनची ह्य़ुंदाईनेही किरकोळ ०.५२ टक्के का होईना वाढ राखली आहे.
दुचाकी वाहन क्षेत्रात हीरो, बजाज, टीव्हीएसने विक्रीतील घसरण नोंदविली आहे. हीरो मोटोकॉर्पची विक्री ६ टक्क्यांनी कमी होत ५ लाखांवर येऊन ठेपली आहे, तर गेल्या आठवडय़ाभरापासून कामगारांच्या संपाचा सामना करणाऱ्या बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही जूनमध्ये घसरण नोंदली गेली आहे. कंपनीच्या मोटारसायकलची विक्री यंदा २० टक्क्यांनी घसरून २,५४,५४४ झाली आहे. दरम्यान, कंपनीची निर्यात मात्र ३.७३ टक्क्यांनी वाढली आहे. व्यापारी वाहन प्रकारात कंपनीला ५३.८३% चांगली मागणी मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा