उत्पादन शुल्कातील कपातीचा कोणता एक परिणाम वाहनविक्रीच्या वाढीवर होताना दिसत नाही. उलट संथ अर्थव्यवस्थेपोटी वाहनांची मागणी सतत रोडावत असून एप्रिलमधील प्रवासी कारविक्री तर वर्षभरातील नीचांकी पातळीवर येऊन ठेपली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या या पहिल्याच महिन्यात ती दुहेरी आकडय़ासह रोडावली आहे. या कालावधीत दुचाकी वगळता इतर सर्व वाहन प्रकार नकारात्मक यादीत नोंदले गेले आहेत. एप्रिल २०१४ मधील एकूण वाहनविक्री किरकोळ, ६.९६ टक्क्यांनी वाढली आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सियाम) या वाहन उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये १,३५,४३३ प्रवासी कार विकल्या गेल्या. वर्षभरापूर्वीच्या १,५०,७३७ तुलनेत ही विक्री १०.१५ टक्क्यांनी कमी आहे.
यापूर्वी मे २०१३ मध्ये सर्वात मोठी प्रवासी कारविक्रीतील घसरण ११.७ टक्के नोंदली गेली होती. वाहनविक्री वाढीसाठी या उद्योगाला आता रिझव्र्ह बँकेच्या व्याज दरकपातीची तसेच वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. यंदाचा चांगला मान्सूनदेखील वाहनविक्रीच्या वाढीला हातभार लावू शकतो.
फेब्रुवारीमधील हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्क २ ते ६ टक्क्यांनी कमी केले होते. संघटनेचे उप महासंचालक सुगातो सेन यांनी, कर कमी केले असले तरी कंपन्यांचा खर्च वाढताच आहे; तेव्हा नव्या सरकारकडून या क्षेत्राकडून आणखी उपाययोजनांची आशा आहे, असे म्हटले आहे. देशाचा सध्याचा ४ ते ५ टक्के विकास दर पुरेसा नसून वाहन उद्योगाच्या उभारीसाठी भारताची अर्थव्यवस्था ७ टक्के दराने प्रगतिशील असावी, अशी अपेक्षाही सेन यांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्राबाबत आशावादी असलेल्या यंदाच्या मान्सूनबाबतही आतापर्यंत शंका उपस्थित झाली असल्याचेही ते म्हणाले. सर्व वाहन प्रकारांमध्ये केवळ दुचाकी क्षेत्राने यंदाच्या एप्रिलमध्ये वाढ राखली आहे. एप्रिल २०१३ च्या तुलनेत ११.६७ टक्क्यांनी उंचावत ३,०४,४४७ झाली आहे. यामध्ये मोटरसायकलची विक्री ८.०६ टक्क्यांनी वाढून ९,११,९०८ झाली आहे.
सियामच्या म्हणण्यानुसार, एकूण प्रवासी वाहने ९.५० टक्क्यांनी घसरली आहेत. तर तीन चाकी वाहने २.१७ व वाणिज्यिक वाहने २४ टक्क्यांनी घसरली आहेत.
वाहनविक्रीचा वर्ष-नीचांकी प्रवास
उत्पादन शुल्कातील कपातीचा कोणता एक परिणाम वाहनविक्रीच्या वाढीवर होताना दिसत नाही. उलट संथ अर्थव्यवस्थेपोटी वाहनांची मागणी सतत रोडावत असून एप्रिलमधील प्रवासी कारविक्री तर वर्षभरातील नीचांकी पातळीवर येऊन ठेपली आहे.
First published on: 10-05-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car sales hit two year low in april