पावसाळ्याचा हंगाम पाहता कमी मागणीचा अंदाज घेत वाहननिर्मिती कंपन्यांनी गेल्या महिन्यात सूट-सवलतींचा धडाका कायम ठेवला. मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही हेच आज जाहीर झालेल्या जुलैमधील वाहन विक्रीच्या आकडय़ावरून स्पष्ट होते. टाटा, मिहद्रसारख्या कंपन्यांना यंदाही मोठय़ा प्रमाणातील वाहन घसरणीला सामोरे जावे लागले आहे. उलट बिकट स्थितीतही फोर्ड, होन्डाने चांगली प्रगती साधली आहे.
चार चाकी वाहने
*  मारुती सुझुकी         +१.३०%
(कंपनीने गेल्या महिन्यात किरकोळ वाढ नोंदविली असली तरी तिच्या एरवी महिन्यातील लाखभर वाहन विक्रीच्या टप्प्यापासून ती लांबच!.)
* ह्युंदाई        -७.८४%
(निर्यातीच्या बाबत क्रमांक एकची कंपनी असलेल्या मूळच्या कोरियन कंपनीला यंदा एकेरी आकडय़ातील घसरण नोंदवावी लागली आहे.)
* टाटा मोटर्स     -२९.९७%
(टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीचा विस्तार होत आहे. यंदा कंपनीची एकूण वाहन विक्री मोठय़ा प्रमाणात रोडावली. प्रवासीसह व्यापारी वाहनांची विक्री तसेच निर्यात यंदा खालावली आहे.)
*  महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र    -२१.१७%
(कंपनी अग्रेसर असलेल्या स्पोर्ट युटिलिटीसह ट्रॅक्टर वगळता इतर सर्वच वाहन क्षेत्रात यंदा पिछाडीवर पडली आहे. कमी मागणीअभावी गेल्या महिन्यात कंपनीला सहा ते आठ दिवस प्रकल्प बंद ठेवावा लागला असतानाच कंपनीने आताही आगामी कालावधीत उत्पादन ठप्प ठेवण्याचे सूतोवाच केले आहे.)
*  होन्डा        +६०%
(कंपनीने कालावधीत तब्बल अडीच पट वाढ नोंदविली आहे. सेदान अमेझने यात मोलाची कामगिरी बजाविली आहे. तिची महिन्यातील सर्वाधिक विक्री जुलैमध्ये झाली आहे. तिची प्रतीक्षा कालावधी रोखण्यासाठी कंपनी तिसऱ्या पाळीमध्ये उत्पादन सुरू करणार आहे.)
* जनरल मोटर्स        -१०.७३%
(एकूण विक्री कमी नोंदविली असली तरी कंपनीच्या बिट, सेल आणि एन्जॉयने चांगला प्रतिसाद नोंदविला. कंपनी सध्या सदोष तवेरामुळे अधिक चर्चेत आहे. कंपनीने सेलचेही उत्पादन तूर्त थांबविले आहे.)
*  फोर्ड        +४८.२३%
(कंपनीने महिन्यातील सर्वाधिक वाहन विक्री जुलैमध्ये नोंदविली आहे. याबाबत कंपनीला तिच्या नव्या दमातील ईकोस्पोर्ट या एसयूव्हीने चांगलाच हातभार लावला आहे. कंपनीला ही वाहने गेल्या काही दिवसांत काही प्रमाणात माघारी बोलवावी लागली असली तरी पदार्पणात, २७ जूनपासून तिची पहिल्या १७ दिवसांत ३० हजारांची नोंदणी झाली आहे.)
*  रेनॉ              +५२%
(बिकट एकूण वाहन विक्री वातावरणातही कंपनीने यंदा दुप्पट वाढ राखली आहे. तिच्या डस्टर या कॉम्पॅक एसयूव्हीला चांगला प्रतिसाद लाभला आहे.)
*  टोयोटा        -१०%
(इटिऑससारख्या वाहनांना मिळालेला मिळत असलेला प्रतिसाद आतासा मंदावल्याचे चित्र यंदा उमटले आहे. तिच्या इन्होव्हा, फॉच्र्युनरसारखी वाहनेही बऱ्यापैकीच विक्री राखत आहेत.)
*  फोक्सवॅगन            -११.५३%
(कंपनीच्या पोलो तसेच सेदान श्रेणीतील वाहनांची जादू आता कमी होत असल्याचे आकडे यंदाच्या महिन्यातून प्रेरित होत आहेत.)