नवी दिल्लीबाहेर भरलेले सर्वात मोठे प्रदर्शन आणि हंगामी अर्थसंकल्पाच्या रुपाने मिळालेली अबकारी कराची घसघशीत कपात या फेब्रुवारीतील उल्लेखनीय घडामोडींनीही देशातील वाहन उद्योगाला तारलेले नाही. गेल्या महिन्यातील वाहन विक्री संमिश्र नोंदली गेली असून आघाडीच्या मारुती, ह्य़ुंदाई, टाटा मोटर्स, मिहद्र अ‍ॅण्ड महिंद्रना घसरणीतील विक्रीला सामोरे जावे लागले आहे. तर नव्या दमाच्या होन्डा, फोर्ड तसेच निवडक दुचाकी कंपन्यांनी चमकदार कामगिरी बजाविली आहे.
मारुती सुझुकी : कंपनीने एकूण विक्रीत किरकोळ घसरण तर देशांतर्गत विक्रीत १.८ टक्के वाढ राखली आहे. कंपनीला छोटय़ा प्रवासी कारबाबत फटका बसला आहे. कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहनांची प्रगती माफक राहिली. सेदान प्रकारातील दोन्ही प्रमुख वाहन विक्रीत वाढ झाली आहे. व्हॅनची संख्या वाढली. नव्या इर्टिगासह जिप्सीची विक्री रोडावली आहे.
एकूण विक्री : १,०९,१०४ (१,०९,५६७)
देशांतर्गतविक्री : ९९,७५८ (९७,९५५)
ह्य़ुंदाई मोटर : देशातील सर्वात मोठी निर्यात वाहन, प्रवासी वाहन विक्रीतील दुसरी कंपनी म्हणून ओळखले जाणाऱ्या या कंपनीने एकूण वाहन विक्रीत १४.९ टक्के तर निर्यातीत तब्बल ३९.५ टक्के घट नोंदविली आहे. देशांतर्गत केवळ २ टक्क्य़ांची वाढ नोंदविणाऱ्या कंपनीने कर कपातीनंतर खरेदीदारांकडून विचारणा वाढल्याचा दावा केला आहे.
एकूण विक्री : ४६,५०५ (५४,६६५)
देशांतर्गतविक्री : ३४,००५ (३४,००२)
टाटा मोटर्स : कंपनीने एकूण वाहन विक्रीत ३५.५६ टक्के घसरण नोंदविली आहे. तर स्थानिक विक्री किरकोळ वाढली आहे. या कालावधीत कंपनीने ९,०२६ नॅनो विकल्या आहेत. वाणिज्यिक प्रकारातील वाहनेही ४९.३७ टक्क्य़ांनी घसरली आहे. कंपनीला सध्या प्रवासी वाहनासह मोठय़ा वाणिज्यिक वाहन श्रेणीतही स्पर्धकांचा सामना करावा लागत आहे.
एकूण विक्री : ३९,९५१ (६१,९९८)
देशांतर्गतविक्री : ११,३२५ (१०,६१३)
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र : कंपनीने देशांतर्गत विक्रीसह एकूण वाहन विक्रीतही यंदा घट नोंदविली आहे. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही५००, झायलो, बोलेरो, व्हेरिटो या वाहनांची विक्री १८ टक्क्य़ांनी घसरली आहे. निर्यातीतही १७ टक्के घसरण झाली आहे. वाहन प्रदर्शन व कर कपातील प्रत्यक्ष लाभ आता दिसू लागेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
एकूण विक्री : ४२,१६६ (४७,८२४)
देशांतर्गतविक्री : ३९,३३८८ (४४,३९९)