देशातील वाहन उद्योगाला गेला महिना चांगला गेला आहे. मारुती, ह्य़ुंदाई, महिंद्रसह अनेक कंपन्यांनी मे महिन्यात वाढीव प्रवासी कार विक्रीची नोंद केली आहे.
देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीच्या ७.१ टक्के एकूण विक्रीत वाढ राखताना ही संख्या १,२३,०३४ वर नेली आहे. तर तिची देशांतर्गत प्रवासी कार विक्री १,१३,१६२ झाली असून त्यात वार्षिक तुलनेत १०.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या छोटय़ा गटातील तसेच कॉम्पॅक्ट सेदान श्रेणीतील वाहनांना काहीसे घसरणीला सामोरे जावे लागले आहे. बलेनो, ग्रॅण्ड व्हिटारा, एस-क्रॉससारख्या नव्या वाहनांच्या जोरावर या गटात दुहेरी आकडय़ांतील वाढीची नोंद करता आली आहे. कंपनीची निर्यात तब्बल २०.८० टक्क्यांनी रोडावली आहे.
निर्यातीत वरचष्मा राखणाऱ्या देशांतर्गत प्रवासी कार विक्रीत दुसरे स्थान मिळविणाऱ्या मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाची एकूण विक्री अवघ्या १.९ टक्क्यांनी वाढली आहे. ५३,५१६ विक्री राखताना कंपनीची निर्यात घसरून ११,८०५ वर आली आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीची विक्री मात्र १०.४१ टक्क्यांनी वाढली आहे.
स्पोर्ट युटिलिटी श्रेणीतील महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या एकूण वाहन विक्रीतही दुहेरी आकडय़ातील वाढ झाली असून मेमध्ये ती ४०,६५६ झाली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्रीवाढीचे प्रमाणही जवळपास एवढेच असून निर्यात २१ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या व्यापारी वाहनांना यंदा १५ टक्केपर्यंत वाढीचा प्रतिसाद मिळाला आहे, तर ट्रॅक्टर विक्री वाढ १९.५३ टक्क्यांनी वाढून २३,०१८ झाली आहे.
व्यापारी वाहननिर्मितीतील आघाडीच्या अशोक लेलॅण्डची एकूण विक्री मेमध्ये ६ टक्क्यांनी उंचावत ९,८७५ झाली आहे. तर नुकताच प्रवेश केलेल्या छोटय़ा वाहनांची विक्री यंदा २,४०६ झाली आहे. याच गटातील व्हीई कमर्शिअल व्हेकल्स (आयशर)ची विक्री ४३ टक्क्यांनी वाढत ५,७७० झाली आहे. कृषी क्षेत्रातील वाहन उत्पादनातील एस्कॉर्ट्सची विक्री १० टक्क्यांनी वाढून ५,३३१ झाली आहे.
दुचाकींमध्ये इंडिया यामाहा, रॉयल एनफिल्ड, हीरो मोटोकॉर्प यांनीही विक्रीतील वाढ गेल्या महिन्यात नोंदविली आहे. इंडिया यामाहा मोटरची दुचाकी विक्री ३६ टक्क्यांनी वाढून ६२,७४८ वर गेली आहे. तर रॉयल एनफिल्डच्या विक्रीत ३७ टक्के वाढ होऊन एकूण विक्री ४८,३५४ झाली आहे. हिरो मोटोकॉर्पला मात्र अवघ्या २ टक्के वाढीचे यश प्राप्त करता आले असून कंपनीची मेमधील विक्री ५.८३ लाख झाली आहे.
वाहन उद्योगासाठी मे महिना लाभदायी
देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीच्या ७.१ टक्के एकूण विक्रीत वाढ
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 02-06-2016 at 07:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car sales up in may