दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसऱ्यासाठी गेल्या महिन्यापासूनच सूट-सवलतींचे तोरण बांधण्याचा फायदा वाहन कंपन्यांच्या सप्टेंबरमध्ये सुधारलेल्या विक्री आकडेवारीवरून दिसून आला.  चालू महिन्यापासून जवळपास सर्वच कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढविल्याचा प्रत्यक्ष यंदाच्या दसऱ्याला काय परिणाम होतो, हीच बाब आता महत्त्वाची ठरणार आहे. सप्टेंबरमध्ये अनेक उत्पादकांची वाहन विक्री वाढली असे मंगळवारी विविध कंपन्यांनी स्वतंत्ररीत्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसते. गेल्या अनेक महिन्यांपासून घसरत असलेली वाहन विक्री आणि त्यातच चलनाचे अवमूल्यन, वाढीव इंधनाच्या किमती या पाश्र्वभूमीवर कंपन्यांनी त्यांच्या अनेक वाहनांवर या कालावधीत सूट-सवलतींचा निर्णय घेतला होता. त्याची प्रत्यक्षात सुपरिणाम दिसून आले.
दुचाकीमध्ये आगेकूच कायम
दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये विक्रीबाबत गेल्या महिन्यात आगेकूच कायम राहिली आहे. हीरो मोटोकॉर्पची विक्री १५.७८ टक्क्यांनी वाढून ५,६८,६७० झाली आहे. कंपनी पुन्हा मासिक ५ लाख विक्रीच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे, तर हीरोची पूर्वाश्रमीची भागीदार होन्डाची विक्री ३५ टक्क्यांनी वाढून यंदा ३,२८,९६५ झाली आहे. जपानच्या सुझुकी मोटारसायकलने ९.०४ टक्के वाढ नोंदवीत ऑगस्टमध्ये ४१,७३४ वाहने विकली आहेत. वर्षभरापूर्वी कंपनीच्या वाहनांची ३८,२७१ वाहनांची विक्री झाली होती. जपानच्या इंडिया यामाहाने ४२ टक्के वाढ नोंदविताना ऑगस्टमध्ये एकूण ६०,०३१ विक्री राखली आहे.
ऑगस्टमध्ये वाहनविक्रीत टोयोटा किर्लोस्कर (१०%), फोर्ड इंडिया (५१%) यांनीही वाढ नोंदविली आहे. देशातील अव्वल मारुती सुझुकीनेही ११.७ टक्क्यांची वाढ राखत एक लाखाचा टप्पा पार केला आहे. कंपनी गेल्या काही महिन्यांपासून या महत्त्वाच्या टप्प्यापासून लांबवरच होता. यंदा कंपनीने १,०४,९६४ वाहने विकली आहेत. एर्टिगा, इको, जिप्सी, ओम्नीतील घसरण मात्र यंदाही आहेच.
महिंद्रची पुन्हा घसरण
स्पोर्ट युटिलिटी श्रेणीतील महिंद्र समूहाला यंदाही घसरणीचा अनुभव घ्यावा लागला आहे. कंपनीच्या वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये १० टक्क्यांनी घसरून ती ४३,२८९ वर आली आहे. कंपनीची निर्यातदेखील ११.८८ टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रवासी वाहनांबरोबर चार चाकी व्यापारी वाहनांमध्येही २ टक्के घसरण झाली आहे. मात्र तीन चाकी वाहन विक्री ५.८६ टक्क्याने वाढली आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरची विक्री ३३ टक्क्यांनी उंचावली आहे. चांगल्या मान्सूनमुळे कंपनीला आगामी कालावधीतही या वाहन प्रकारात वाढीची अपेक्षा आहे.
टाटाची विक्री कमीच
टाटा मोटर्सची वाहन विक्री यंदाही कमीच राहिली आहे. कंपनीने ३३.४४ टक्क्यांची घट नोंदवीत यंदा ५०,४२७ वाहने विकली आहेत. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीच्या विक्रीची संख्या ७५ हजारांहून अधिक होती. कंपनीने गेल्या काही दिवसांपासून तिच्या निवडक वाहनांवर रोख सवलतींबरोबरच प्रसार मोहीमही तीव्र केली आहे.
हुंदाईची निर्यातही रोडावली
ह्य़ुंदाई या मूळच्या कोरियन कंपनीला यंदा विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे. एरवी देशातील दुसऱ्या क्रमांकाची आणि निर्यातीत आघाडीवर असणाऱ्या या कंपनीची ऑगस्टमधील विक्री ४ टक्क्यांनी घसरली आहे. या कालावधीत कंपनीची ५१,४१८ वाहने विकली गेली. त्याचबरोबर निर्यातही ८.३१ टक्क्याने घसरली आहे.

Story img Loader