आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलासह प्रमुख जिनसांच्या घसरलेल्या किमतींनी जागतिक बाजारपेठांमध्ये घबराट निर्माण केली. जागतिक मागणीचा मापदंड असलेल्या तांब्याच्या किमती साडे-सहा वर्षांपूर्वीच्या स्तरावर रोडावल्याने जग नव्या मंदीच्या तोंडावर उभा असल्याचे चित्र निर्माण केले. ब्रेन्ट क्रूड मार्च २००९ नंतर प्रथमच प्रति पिंप ४५ डॉलरखाली आले आहे.
सोमवारच्या शांघाई निर्देशांकातील (आपले बाजार उघडण्यापूर्वीच!) सुमारे ९ टक्क्यांच्या पडझडीने चीनच्या बाजाराने वर्षभरात केलेली संपूर्ण कमाई धुवून काढली. त्या बाजारातील ती २००७ नंतरची सर्वात मोठी घसरण ठरली. चीनमधील या गटांगळीने भारतासह सर्वच आशियाई बाजारांचे निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक घसरणीनेच खुले झाले.
चीनचे चलन युआनमधील तेथील सरकारने केलेल्या अवमूल्यनातून जगातील दुसरया क्रमांकांच्या या अर्थव्यवस्थेच्या सशक्तेबाबतच संशय निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांना भीती आहे की, युआनचे यापुढेही अवमूल्यन केले जाईल, ज्यातून चलन-युद्धाचा भडका होईल. सध्या या परिणामी मलेशिया, तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका या देशांच्या चलनांनी बहुवार्षकि नीचांकाला लोळण घेतली आहे. भारताचा रुपयाही (डॉलरच्या तुलनेत) दोन वर्षांपूर्वीच्या स्तरावर ढेपाळला आहे.
रुपयाच्या या अवमूल्यनाने स्थानिक बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या फायद्याला मोठ्या प्रमाणात कात्री लागली आहे. रुपयाच्या गेल्या दोन आठवडय़ांपासून निरंतर सुरू असलेल्या पतनाने विदेशी संस्थांकडून गुंतलेला निधी मोठय़ा प्रमाणात काढून घेतला जात आहे, ज्या परिणामी रुपयाच्या विनिमय मूल्यावर दबाव आणखीच वाढला आहे.
बाजार वरच्या स्तरावर असताना खरेदी केलेल्या सामान्य भारतीय गुंतवणूकदारांना गेल्या आठवडाभर शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीने त्यांची गुंतवणूक नुकसानीत गेल्याचे आढळून आले. सोमवारच्या सकाळच्या प्रारंभिक पडझडीनंतर खालच्या भावात खरेदीची संधी साधणारे, अल्पावधीतच पडझड वाढत गेल्याने आणखी नुकसानीत गेले.
अशा गुंतवणुकीपासून मोकळे होण्यासाठी मग छोट्या गुंतवणूकदारांकडून भीतीने विक्रीचा मारा सुरू झाला. ज्या परिणामी पडझडीने सर्वदूर व व्यापक रूप धारण केलेले दिसून आले.
‘फेड’कडून व्याजदर वाढ तर नाहीच; उलट ‘क्यूई’च्या पुनरावृत्तीची शक्यता
आपटीचे परिणाम काय?
गेली दोन महिने चीनच्या सरकारच्या अर्थव्यवस्थेतील असाधारण हस्तक्षेपानंतरही तेथील भांडवली बाजारात पडझड रोखली जाण्याऐवजी उलट बळावली आहे. जागतिक अर्थवृद्धीची आजपावेतो चालकशक्ती ठरलेल्या चीनमधील ताज्या घटनाक्रमाने साहजिकच संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. तेल, धातू आदींच्या निर्यातीवर निर्भर देशांच्या अर्थव्यवस्थांना चिनी युआनच्या अवमूल्यनाने आघात पोहचविला आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हपुढे यातून आव्हानात्मक स्थिती निर्माण केली आहे. डिसेंबर २००८ मध्ये शून्यवत करण्यात आलेले अमेरिकेतील व्याजाचे दर येत्या सप्टेंबरपासून वाढतील, असे संकेत फेडच्या अध्यक्षा जॅनेट येलेन व त्यांचे सहकारी देत आले होते. परंतु प्राप्त स्थितीत व्याजदरात वाढ, वित्त बाजारासाठी विधायक ठरण्याऐवजी प्रतिकूल परिणाम साधेल, असा बीएनपी परिबा या जागतिक पतमापन संस्थेचा कयास आहे. त्यामुळे सप्टेंबरच काय, आगामी डिसेंबरनंतरही फेडकडून व्याजदर वाढ होणे संभव नाही. किंबहुना व्याजदर वाढीऐवजी, अर्थव्यवस्थेतील रोकड तरलता वाढविण्यासाठी पुन्हा रोख्यांच्या खरेदीसारख्या क्यूई कार्यक्रम सुरू करावा लागण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. अर्थात ही बाब भारताच्या बाजाराच्या व अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर पडणारीच ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा