वार्षिक पाच लाखपर्यंतचे  उत्पन्न असणाऱ्या पगारदारांना प्राप्तिकर विवरणपत्र न भरण्यासाठी गेली दोन वर्षे सुरू असलेली मुभा संपुष्टात आली असून चालू वर्षांत त्यांना प्राप्तिकर विवरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
वार्षिक ५ लाखपर्यंतचे उत्पन्न असणारे नोकरदार तसेच बचतीद्वारे वर्षांला १०,००० रु. पर्यंत व्याजाचे उत्पन्न घेणाऱ्या ठेवीदारांना प्राप्तिकर विवरण भरण्यापासून गेल्या दोन वर्षांपासून (२०११-१२ व २०१२-१३) सूट होती. २०१३-१४ या चालू आर्थिक वर्षांपासून मात्र दोन्हींसाठी कर परतावा भरणे अनिवार्य करण्यात आल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे.
वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाइन भरणेही सक्तीचे करण्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपाने विवरणपत्र सादर करण्यापेक्षा आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर ते अधिक सुलभ असल्याचा दावा मंडळाद्वारे करण्यात आला आहे.