व्यवसाय अनियमिततेप्रकरणी स्पर्धा आयोगाचा दणका
मालवाहतुकीसाठीच्या इंधन अधिभारात अनियमितता अनुसरल्याबद्दल आघाडीच्या तीन प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना भारतीय स्पर्धा आयोगाने तब्बल २५८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जेट एअरवेज, इंडिगो आणि स्पाइसजेट या त्या तीन कंपन्या आहेत. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीतून एअर इंडिया व गो एअरलाइन्स मात्र नियामकाच्या दंडातून सुटल्या आहेत.

एक्स्प्रेस इंडस्ट्री कौन्सिल ऑफ इंडियाने उपरोक्त कंपन्यांबाबतची तक्रार भारतीय स्पर्धा आयोगाकडे केली होती. या कंपन्या मालवाहतूक हाताळताना लावणाऱ्या इंधन अधिभारात व्यवसाय अनियमितता करीत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. यावर निर्णय देताना आयोगाने जेट एअरवेज, इंडिगो व स्पाइसजेट यांना अनुक्रमे १५१.६९, ६३.७४ व ४२.४८ कोटी रुपयांचा दंड जाहीर केला आहे.
आयोगाच्या दंडाबाबत तीनही कंपन्यांपैकी कोणीही अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या इंडिगोची गेल्याच आठवडय़ात भांडवली बाजारात सूचिबद्धता झाली. तर जेट एअरवेज व स्पाइसजेट यापूर्वीच बाजारात नोंदणीकृत आहेत.

सार्वजनिक एअर इंडिया व गो एअर यांच्याबाबत तथ्य आढळले नसल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला नसल्याचे आयोगाने याबाबतच्या निकालात स्पष्ट केले आहे. तर अन्य तीन कंपन्यांवर स्पर्धा कायद्याच्या कलम ३ नुसार कारवाई करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader