नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांतील सरलेल्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) सात लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या कर संकलनात वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
चालू वर्षांत एप्रिल ते जून २०२२ या दरम्यान अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून ३.४४ लाख कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत आला असून, गत वर्षांच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच व्यक्तिगत प्राप्तिकर, कंपनी कर, संपत्ती कर आदींचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष कराचे सरकारचे संकलन सरलेल्या तिमाहीत दुहेरी अंकाने वाढले आहे. एप्रिल ते जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून ३.५५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षांत, अर्थव्यवस्थेवरील करोना पाश सैल होत असताना केंद्र सरकारने केलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांनी कर संकलन वाढीस हातभार लावला आहे, असे चौधरी यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षांत सरकारला १९.३५ लाख कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. जे गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ६ टक्क्यांहून अधिक आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’रूपी अप्रत्यक्ष करांच्या संकलनात चढती भाजणी सुरू असल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षांत देखील अर्थसंकल्पीय लक्ष्याचे उद्दिष्ट ओलांडण्याची आशा आहे.