राज्यातील नवीन युतीच्या सरकारकडून उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक निर्णय घेतले असून, विजेच्या प्रश्नावरही चालू महिन्याच्या अखेपर्यंत निर्णय घेतला जाईल. प्रति युनिट १.५० रुपयांनी विजेचे दर कमी करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूरमधील अनेक उद्योगांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेतली असल्याचे नमूद करून देसाई म्हणाले की, विजेचे दर परवडेनासे झाले म्हणून उद्योगांनी शेजारच्या राज्यात जाऊन आपला व्यवसाय करावा लागत असल्याच्या स्थितीची आपल्याला जाणीव आहे. उत्पन्नातील १० टक्के हिस्सा हा विजेसाठी खर्च होणे हे उद्योगांना आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणारे निश्चितच नाही आणि या समस्येचे लवकरच समाधान शोधले गेले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी या समस्याग्रस्त उद्योगांना दिलासा दिला.
२०१९ साली ‘सर्वासाठी वीज’ हे लक्ष्य राज्य सरकारने ठरविले असून, त्यासाठी सर्वाना समान दरात वीज देण्याच्या पूर्वअटीचे सरकारकडून पालन केले जाईल. इतरांना सवलतीत होणाऱ्या वीजपुरवठय़ाचा भार सर्वस्वी उद्योगांच्या माथी लादणाऱ्या धोरणाला मुरड घातली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया टेक फाऊंडेशनने हॉटेल ललित, अंधेरी येथे ‘सर्वासाठी वीज’ याच विषयाला वाहिलेल्या १६ व्या पॉवर, कॉन्स्ट्रुटेक आणि सातव्या रिन्यू टेक या तिहेरी प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना देसाई यांनी वरील विधान केले.
माजी केंद्रीय ऊर्जा सचिव पी. उमाशंकर, केंद्रीय वीज आयोगाचे अध्यक्ष मेजर सिंग आणि इंडिया टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष इंद्र मोहन या समयी व्यासपीठावर उपस्थित होते.