जवळपास सव्वा वर्षांपूर्वीच्या उच्चांकी टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनदराने भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास पुन्हा सुबत्तेकडे सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. २०१२-१३ ची अखेर काही महिन्यांवरच असताना ८.२ टक्क्यांवर गेलेल्या देशांतर्गत कारखानदारीच्या या विकासदराला केवळ आता मध्यवर्ती बँक अर्थात रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची जोड मिळणे बाकी आहे. तथापि नोव्हेंबरमध्ये दुहेरी आकडय़ाकडे भयकारक सरकणारा किरकोळ महागाई दर मात्र रिझव्र्ह बँकेला तसे करण्यापासून रोखणारा ठरण्याची शक्यताही दिसून येते.
खुद्द केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांच्या निर्मितीबाबतच्या या ताज्या निर्दशकांने आपल्यालाही स्फुरण दिले असल्याची कबुली दिली. ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनदराचे वधारते आकडे हे खूपच उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रतिसाद काय राहतो याकडे आपले लक्ष असल्याचे प्रतिपादन करून देशात गुंतवणूकपूरक वातावरण निर्माण होत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनीही यंदाचे दर हे अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आले असल्याचे नमूद करीत त्याचे स्वागत केले. ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनदर जून २०११ नंतर प्रथमच आठ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. वर्षभरापूर्वी ते उणे ५ टक्के होते. तर सप्टेंबर २०१२ मध्ये ते ०.७ टक्के होते. एप्रिल ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत मात्र औद्योगिक उत्पादन दर वर्षभरापूर्वीच्या ३.८ टक्क्यांवरून १ टक्क्यांवर आला आहे. मार्च २०१२ पासून हा दर दोन वेळा (मे २.५% आणि ऑगस्ट २.३%) वगळता उणे राहिला आहे. तर यापूर्वी जून २०११ मध्ये हा दर सर्वाधिक ९.५ टक्के होता. यंदाच्या सुधारलेल्या औद्योगिक उत्पादनदरात दुहेरी आकडय़ातील ग्राहकोपयोगी वस्तू व विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राचे भरीव योगदान राहिले आहे.
औद्योगिक उत्पादनदरात सर्वाधिक ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्रासह (९.६%) २२ पैकी तब्बल १७ उद्योगक्षेत्रांनी यंदाच्या ऑक्टोबरमध्ये वाढ नोंदविली आहे. भांडवली वस्तू (७.५%), ऊ र्जा निर्मिती (५.५%), ग्राहकोपयोगी वस्तू (१३.२%) यांची कामगिरी या कालावधीत उंचाविली गेली. तर खनिकर्म (-०.१%) क्षेत्राने मात्र नकारात्मक कामगिरी बजाविली आहे. चालू आर्थिक वर्षांअखेर ६ टक्के विकास दर गाठावयाचा असल्यास उर्वरित कालावधीत औद्योगिक उत्पादनाचा दर हा ८ ते ९ टक्के असायला हवा, अशी अपेक्षा रंगराजन यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा