रघुराम राजन हे जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक असून त्यांच्यासारखा गव्हर्नर मिळायला मोदी सरकार पात्र आहे का, अशी शंका आपल्याला वाटत असल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. ते शनिवारी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चिदंबरम यांना गेल्या काही दिवसांत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी पी. चिदंबरम यांनी म्हटले की, यूपीए सरकारच्या कार्यकाळात जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक असलेल्या राजन यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि आजही तो कायम असल्याचे त्यांनी सांगितले. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे सुब्रमण्यम स्वामी सातत्याने मोदींकडे राजन यांना मुदतवाढ न देण्याची मागणी करत आहेत. याबद्दल विचारण्यात आले असता, हे सरकार राजन यांच्यासारखा गव्हर्नर लाभण्याइतके पात्र आहे का, अशी शंका आपल्याला वाटत असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले.
दरम्यान, यूपीएच्या कार्यकाळातही काही मुद्द्यांवर तुम्ही राजन यांच्याशी असहमत होतात, याकडे लक्ष वेधले असता, जगाच्या पाठीवर अर्थमंत्री आणि गव्हर्नर यांच्यात असेच संबंध असतात, असे चिदंबरम यांनी सांगितले. मात्र, याचा अर्थ अर्थमंत्र्याने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या कुवतीविषयीच शंका उपस्थित करावी, असा होत नसल्याचे चिंदबरम यांनी सांगितले.

Story img Loader