लवकरच अवतरत असलेल्या नव्या भांडवली बाजाराशी स्पर्धेचा जिम्मा राष्ट्रीय शेअर बाजाराने एका महिला मुख्याधिकाऱ्यावर सोपविला आहे. ‘एनएसई’च्या सध्या सह-व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चित्रा रामकृष्ण यांना नव्या आर्थिक वर्षांपासून देशातील सर्वात मोठय़ा शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देण्याचे निश्चित झाले आहे. या रूपाने भांडवली बाजाराचे प्रमुखपद भूषविणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्याधिकारी ठरल्या आहेत.
देशातील तिसरा मोठा भांडवली बाजार म्हणून एमसीएक्स-एसएक्स उदयास येत असून लवकरच त्याच्या व्यवहारास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. वायदे आणि चलन व्यवहारात एमसीएक्स-एसएक्सने एनएसईला कट्टर स्पर्धा दिली आहे. आताही उभय बाजारांची समभाग स्पर्धा जोर धरणार आहे. या पाश्र्वभूमिवर चित्रा रामकृष्ण यांची निवड महत्त्वाची घटना मानली जात आहे.
बढती मिळालेल्या चित्रा रामकृष्ण यांची मुख्याधिकारी म्हणून येत्या पाच वर्षांसाठी नियुक्ती असेल. ४९ वर्षांच्या चित्रा या सनदी लेखापाल आहेत. राष्ट्रीयकृत आयडीबीआयमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी हाताळली आहे. आर. एच. पाटील हे एनएसईचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्याबरोबरच्या पाच निवडक कर्मचाऱ्यांमध्ये चित्रा रामकृष्ण यांचा समावेश होता. २००१ मध्ये मर्यादित कालावधीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या अध्यक्षा झालेल्या दिना मेहता यांच्यानंतर चित्रा या देशातील भांडवली बाजाराच्या दुसऱ्या महिलाप्रमुख झाल्या आहेत. तर आशिया विभागात यापूर्वी चीनच्या लिन्गपिन्ग सॉग या शांझेन तर कोलंबो शेअर बाजाराच्या प्रमुख सुरेखा सेलाहेवा प्रमुख पदावर आहेत.
‘एनएसई’च्या स्थापनेपासून असणाऱ्या चित्रा यांच्या नव्या पदभारानंतर भांडवली बाजाराचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवि नारायण हे १ एप्रिल २०१३ पासून बिगर कार्यकारीच्या भूमिकेत उपाध्यक्ष असतील. त्यांचा सध्याचा कार्यकाळ ३१ मार्च २०१३ रोजी संपत असल्याने त्यांच्या जागी चित्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामकृष्ण आणि नारायण हे दोघेही राष्ट्रीय शेअर बाजार अस्तित्वात आल्यापासून तेथे आहेत. तर नारायण यांनी सुरुवातीला ६ वर्षे उप व्यवस्थापकीय पद सांभाळले व १२ वर्षे ते या भांडवली बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ. विजय केळकर हे राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष राहिले आहेत. सध्या या शेअर बाजाराच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत.
एनएसईच्या मुख्याधिकारीपदी चित्रा रामकृष्ण
लवकरच अवतरत असलेल्या नव्या भांडवली बाजाराशी स्पर्धेचा जिम्मा राष्ट्रीय शेअर बाजाराने एका महिला मुख्याधिकाऱ्यावर सोपविला आहे. ‘एनएसई’च्या सध्या सह-व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चित्रा रामकृष्ण यांना नव्या आर्थिक वर्षांपासून देशातील सर्वात मोठय़ा शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देण्याचे निश्चित झाले आहे. या रूपाने भांडवली बाजाराचे प्रमुखपद भूषविणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्याधिकारी ठरल्या आहेत.
First published on: 28-11-2012 at 12:12 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra ramkrushna ceo on nse