स्थावर मालमत्ता क्षेत्राने पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धनात महत्त्वाचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने विकासकांची पावले पडत असून भारताला हरित इमारत उभारणीत अव्वल स्थान देण्याच्या या पुढाकारात ‘सीआयआय’ही सहभागी झाली आहे.

हरित इमारत उभारणी (ग्रीन बिल्डिंग) मोहिमेंतर्गत २०२५ पर्यंत भारतात १० अब्ज चौरस फूट क्षेत्रफळ विकसित करण्याचे ध्येय राखण्यात आले असून याबाबत अमेरिकेला मागे सारून क्रमांक- १ चे स्थान राखण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

‘इंडिया ग्रीन बिल्िंडग कौन्सिल’चे (आयजीबीसी) मुंबई पर्व आणि ‘भारतीय औद्योगिक महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत या मोहिमेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील वर्षांसाठी पाच अब्ज चौरस फूट हरित इमारत उभारणीचे लक्ष्यही या वेळी निर्धारित करण्यात आले.

‘आयजीबीसी’चे अध्यक्ष डॉ. प्रेम जैन यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, सध्या हरित इमारत उभारणीत अमेरिका ६.७ अब्ज चौरस फूट क्षेत्रफळासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल आहे. तर भारत अद्यापही याबाबत मागे आहे. देशाचे यास्तरावरील स्थान येत्या नऊ वर्षांत क्रमांक एकवर नेण्याचे ध्येय आहे. हरित इमारत उभारणीत मुंबई तसेच महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. हरित इमारत उभारणी ही कमी खर्चात करण्याचे मोठे आव्हान भारतीय उद्योगापुढे असले तरी आघाडीच्या विकासकांच्या जोरावर ते सहज शक्य होईल, असा दावा त्यांनी केला.

हरित इमारत उभारणीबाबत सध्या केंद्र सरकार तसेच विविध राज्य शासन यांचेही प्रोत्साहनात्मक धोरणे तयार होत असल्याचे नमूद करत जैन यांनी विकासकांमध्येही याबाबत जागरूकता दिसत असल्याचे नमूद केले. एकूणच या विषयाला हात घालण्यासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईत परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यात विविध देश सहभागी होतील. या परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची जोड असेल, असे त्यांनी सांगितले. हरित इमारत उभारणीकरिता लागणाऱ्या विविध निर्मित वस्तूंची तसेच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ बनावटीची उपकरणे, साहित्यांची मांडणी या परिषदेत असेल, असेही ते म्हणाले.

Story img Loader