विरंगुळ्याचे दर्जेदार साधन आणि सोबतीला व्यायाम-कसरतही अशा क्लब्सची वानवा आणि आहेत त्या मोजक्या क्लब्समधील भरगच्च गर्दी पाहता मुश्कीलीचे बनलेले सदस्यत्व ही शहरी मंडळींची समस्या आताशी दूर होईल आणि देशात खऱ्या अर्थाने क्लब संस्कृतीची रुजुवात होऊ घातली आहे, असे प्रतिपादन देशातील हेल्थ क्लब्सची सर्वात मोठी शृंखला असलेल्या तळवलकर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी प्रशांत तळवलकर यांनी बुधवारी येथे बोलताना केले. ब्रिटनस्थित डेव्हिड लॉइड लीजर लिमिटेड या कंपनीबरोबर ‘तळवलकर्स’च्या विशेष सामंजस्य कराराची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
मुंबईत १९३२ साली व्यायामशाळांच्या माध्यमातून देशात कसरतीतून शरीरस्वास्थ्य कमावणाऱ्या संघटित सेवा दालनांपासून सुरुवात झालेल्या तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि. असे आधुनिक रूप धारण करणाऱ्या या कंपनीचे देशातील ६८ शहरांमध्ये १३०  हेल्थ क्लब्सचे जाळे सध्या पसरले आहे. आता युरोपातील याच धाटणीची अग्रेसर शृंखला डेव्हिड लॉइडबरोबर झालेले सुरु झालेली भागीदारी ही देशभरात क्लब्स संस्कृतीच्या उत्कर्षांला मोठा हातभार ठरेल, असा विश्वास तळवलकर यांनी व्यक्त केला.
देशात नव्याने उभे राहणारे स्पोर्ट्स क्लब्स, निवासी प्रकल्प, टाऊनशिप्स आणि कॉर्पोरेट कॅम्पसेसना लक्ष्य करून या भागीदारीतून त्या ठिकाणी अत्यावश्यक ठरणारी विरंगुळा, खेळ, कसरतीची सुविधा उभारण्यासाठी ही नवीन भागीदारी सल्लागार सेवा, प्रत्यक्ष कार्यवाही, देखरेख व व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष परिचालन अशा चार प्रकारच्या सेवा प्रदान करेल. साधारण प्रकल्प खर्चाच्या ७.५ ते १० टक्के इतके शुल्क आकारून या सेवा मिळविता येतील.     

Story img Loader