स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ नळाद्वारे होणाऱ्या वायुपुरवठय़ाचे (पीएनजी) दरही वाढले आहेत. मुंबई शहरात महानगर गॅस लिमिटेडतर्फे वितरण होत असलेल्या पीएनजी तसेच वाहनांसाठीचे वायूदरही (सीएनजी) शुक्रवार मध्यरात्रीपासून वाढविण्यात आले आहेत.
मुंबईत सीएनजी प्रति किलो ४.५० रुपये तर पीएनजी २.४९ प्रति एससीएम (स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर) रुपयांनी वधारले आहे. संबंधित वजनासाठी मुंबईकरांना सीएनजीपोटी आता ४३.४५ रुपये तर पीएनजीसाठी २६.५८ e05रुपये मोजावे लागतील.
केंद्र सरकारने देशांतर्गत नैसर्गिक वायुचे दर ४.२० डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश औष्णिक एककवरून ५.६१ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश औष्णिक एकक (एमएमबीटीयू) केल्यामुळे स्वयंपाक तसेच वाहनांसाठीचे दर वाढविणे अपरिहार्य असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत वाढीव वायू दर हे अनुक्रमे ६० व ३२ टक्क्यांनी स्वस्तच असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कर आदी धरून सीएनजीचे दर ४३.४५ ते ४४.७० रुपये प्रति किलो दरम्यान असतील. तर पीएनजीचे दर २६.५८ ते २७.०० रुपये व २९.२६ ते २९.६८ एससीएम असे दोन टप्प्यांत असतील. पीएनजीसाठी कंपनीने तिसऱ्या टप्प्याची रचना कायम ठेवतानाच पहिला टप्पा ०.० ते १.२ एससीएमडी (आधीचा ०.० ते ०.५०) व दुसरा टप्पा १.२ ते २.०० एससीएमडी (आधीचा ०.५० ते ०.९०) असा अद्ययावत केला आहे.