आयडीबीआय बँक, इफ्को, नाबार्ड, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि कॉमेक्स टेक्नॉलॉजी यांचा संयुक्त उद्यम उपक्रम असलेल्या ‘युनिव्हर्सल कमॉडिटी एक्स्चेंज’ या नवीन राष्ट्रीय पातळीवरील कमॉडिटी वायदे व्यवहार मंचावर शुक्रवारी सायंकाळी औपचारिक मुहूर्ताचे व्यवहार झाल्यानंतर, सोमवारपासून नियमित सौद्यांना सुरुवात झाली. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल तसेच फॉरवर्ड मार्केट्स कमिशनचे अध्यक्ष रमेश अभिषेक यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात यूसीएक्स मुहूर्ताचे सौदे करण्यात आले. ‘यूसीएक्स’ मंचावर पहिल्या टप्प्यात सोने (सोने किलो व सोने नॅनो), चांदी (चांदी ३० आणि चांदी नॅनो), कच्चे तेल, चणा, रबर, आरएसएस ४, मोहरी, सोयबीन, रिफाइन्ड सोया तेल आणि हळद आदींचे वायदा सौदे होतील. सध्या परवानगी असलेल्या जिन्नसांसाठी सौद्यांचे नवीन प्रकार विकसित करण्याबरोबरच, पुढील काळात आवश्यक त्या मंजुऱ्या मिळवून काही नवीन जिन्नस या बाजारात आणले जातील, असे यूसीएक्सचे अध्यक्ष केतन शेठ यांनी स्पष्ट केले. देशातील कृषी उत्पादने व अन्य जिन्नसांच्या प्रभावी किंमत निश्चितीची काळजी घेताना, कमॉडिटी एक्स्चेंजसारख्या पारदर्शी व्यापार मंचाची भारतात अधिकाधिक संख्या ही आवश्यकच ठरेल, असे यूसीएक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी प्रवीण पिल्ले यांनी सांगितले. यूसीएक्सकडे सादर झालेल्या ३०० प्रस्तावांपैकी एक तृतीयांश म्हणजे १०० जणांना यशस्वीरीत्या बाजारमंचावरील व्यापारकर्ते (ट्रेड पार्टिसिपंट्स) म्हणून सहभागी करून घेण्यात आले असून, अन्य दोन तृतीयांश हे सदस्यत्व प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत.

Story img Loader