इंधनाच्या वाढत्या किंमतींचा फटका वाहन विक्रीला बसत असतानाच त्यातून सावरण्यासाठी सूट-सवलतींचा पर्याय अनुसरल्यानंतर देशातील विशेषत: दुचाकी कंपन्या आता सर्वात स्वस्त वाहने सादर करण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. देशातील सर्वात स्वस्त दुचाकी सादर करण्याची मनिषा इंडिया यामाहाने व्यक्त केली असताना जपानच्याच होन्डा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया कंपनीने कंपनीची सर्वात स्वस्त मोटरसायकल बाजारातही आणली आहे.
कंपनीचा राजदूत अक्षयकुमारच्या प्रचार मोहिमेवर ‘ड्रिम युगा’ला मिळालेल्या यशानंतर होन्डा कंपनीने याच नामसाधम्र्याची आणि समकक्ष किंमतीची ‘ड्रिम निओ’ ही मोटरसायकल बुधवारी नवी दिल्लीत सादर केली. आधीच्या बाईकची किंमत ४५,१०१ ते ४८,६१९ रुपयां दरम्यान असतानाच नवी बाईकही ११० सीसी इंजिन क्षमतेसहच ४३,१५० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन्ही दुचाकींची इंधन क्षमता ७४ किलोमीटर प्रति लिटर आहे. स्वस्त आणि कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींना असलेली ग्राहकांची पसंती पाहता यात १५० टक्क्यांची वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षांत कंपनी ३९.३ लाख वाहनविक्री करेल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केईता मुरामात्सु यांनी व्यक्त केला.
१ एप्रिलपासून दुचाकींच्या किंमती ८०० रुपयांपर्यंत वाढविल्यानंतर कंपनीची वाहने आता ४४,७१८ (सर्वात स्वस्त मॉडेल ११० सीसी डिओ-स्कूटर) रुपयांपुढे आहे. कंपनी सध्या विविध ८ प्रकारची दुचाकी बनविते. त्यांच्या किंमती ४५,१०१ ते १.७७ लाख रुपयांदरम्यान आहेत. ड्रिम युगा’नंतर येणारी ड्रिम निओ’ ही मोटरसायकल कंपनीची सर्वात स्वस्त दुचाकी ठरली आहे. तिची किंमत ४३,१५० रुपये (एक्स शोरुम-नवी दिल्ली) आहे.
होन्डाची माजी भागीदार आणि आता कट्टर स्पर्धक बनलेल्या हीरो मोटोकॉर्पची सध्या सर्वात स्वस्तातील ‘एचएफ डॉन’ ही मोटरसायकल असून तिची किंमत ३६,६०० रुपये आहे. इंडिया यामाहानेही अवघ्या २७,५०० रुपयांमध्ये दुचाकी उपलब्ध करून देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. मात्र कंपनीची ही मोटरसायकल असेल की स्कूटर हे येत्या काही महिन्यात सादर होणारे हे वाहनच स्पष्ट करेल. कंपनीने गेल्याच वर्षांत स्कूटर निर्मिती क्षेत्रात शिरकाव केला आहे. यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण राजदूत आहे.
होन्डा   रु. ४३,१५०(ड्रिम निओ)
हीरो   रु. ३६,६००(एचएफ डॉन)
यामाहा रु.२७,५००(लवकरच..)