चलनातील सध्याचे अवमूल्यन आणि बिकट अर्थव्यवस्था यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतून देश निश्चितच बाहेर पडेल, असा विश्वास रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिला. राजन यांनी प्रत्यक्ष पदग्रहणापूर्वी विशेष कर्तव्यावरील विशेष अधिकारी या नात्याने गुरुवारी आर्थिक राजधानीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्यालयात सेवेस सुरुवातही केली. गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाची बैठकही मुख्यालयात होती, परंतु ‘मिंट रोड’वरील पहिला दिवस बँकेच्या वरिष्ठ अधिकारी, संचालकांशी संवादात व्यतीत केला. डॉलरच्या तुलनेत होणारे रुपयाचे अवमूल्यन असो अथवा सध्याची अर्थव्यवस्थेची  बिकट स्थिती, हे एक आव्हानात्मक वातावरणच आहे; मात्र त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्नही होतील, आवश्यक त्या उपाययोजनांच्या जोरावर या संकटांवर मात करता येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. रिझव्‍‌र्ह बँक ही देशातील एक उत्तम संस्था असून येथील प्रत्येकाबरोबर काम करणे निश्चितच आनंदाचे असेल, असेही ते बँकेतील बैठकीनंतर वार्ताहरांना म्हणाले. दशकभराच्या कालावधीनंतर रिझव्‍‌र्ह बँकेला लाभलेले बिगर प्रशासन अधिकारी म्हणूनही राजन यांचे नाव घेतले जाते.
अनोखा पायंडा
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांनी प्रत्यक्षात कारभार हाती घेण्याला तीन आठवडे शिल्लक आहेत, पण या तीन आठवडय़ांत रिझव्‍‌र्ह बँकेत ‘विशेष कर्तव्यावरील अधिकारी (ओएसडी)’ या नात्याने त्यांनी कार्यरत राहावे, असा निर्णय अर्थमंत्रालयाने गुरुवारी घेतला. रिझव्‍‌र्ह बँकेत गव्हर्नरपदाचे अशाप्रकारे संक्रमण होण्याचा हा पहिलाच प्रसंग असून, हे पद मिळविणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले डॉ. राजन यांनी यातून नवा पायंडाही घालून दिला आहे. डॉ. राजन हे सध्या अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आगामी तीन आठवडे ते विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या हाताखाली काम करतील आणि त्यानंतर येत्या ५ सप्टेंबर २०१३ रोजी आगामी तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारतील.