डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक हे एका ठराविक पातळीत फेर धरताना दिसून आले असले तरी बऱ्याच मिडकॅप समभागांमध्ये विशेषत: गेल्या सहा ते सात दिवसात १५ ते ३० टक्के वाढ झालेली आहे. उल्लेखनीय म्हणजे आघाडीचे भांडवली वस्तू समभाग भेल, लार्सन अॅण्ड टुब्रो, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्देखील वाढले आहेत. भांडवली वस्तूंना अर्थव्यवस्थेत मागणी वाढणे हे अर्थ-उभारीचे लक्षण मानले जाते. पण त्याचवेळी गेल्या वर्ष दीड वर्षांतील अर्थव्यवस्थेतील मरगळीने अनेक कंपन्यांच्या प्रवर्तकांना आपापल्या कंपनीतील भांडवल गहाण ठेवून पैसा उभारावा लागला आहे. अनेक प्रवर्तकांनी कंपनीतील आपला १०० टक्के हिस्सा बँकांकडे गहाण ठेवला आहे, अशा कंपन्यांची संख्या काही शेकडय़ाच्या घरात आहे. अशा कंपनीची आर्थिक स्थिती निश्चितच चांगली नाही, किमान छोटय़ा मंडळींसाठी गुंतवणूकयोग्य नाही, असा संकेत दिला जावा असा बाजार नियंत्रकांचा हेतू दिसतो. म्हणूनच ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवर्तकांचा हिस्सा गहाण असलेल्या कंपन्यांचे समभाग ‘फ्युचर्स अॅण्ड ऑप्शन्स’ व्यवहारातून बाहेर काढण्याचे घाटत असल्याची बाजारात जोराची चर्चा आहे. याचा फटका काही समभागांना निश्चितच बसला आहे.
तीन आठवडय़ांच्या सलग तेजीनंतर आता बाजाराला स्वाभाविक ब्रेक लागला आहे. अपेक्षेप्रमाणे विदेशी वित्तसंस्थांचा (एफआयआय) खरेदीचा क्रम कायम असून, देशी वित्तसंस्था व म्युच्युअल फंड विक्री करून नफा पदरी पाडत आहेत. पण २० महिन्यांपूर्वीचा उच्चांक ‘सेन्सेक्स’कडून पुन्हा सर केला जाणे ही घटनाच बाजारापासून पाठ फिरविलेल्या छोटय़ा गुंतवणूकदारांना पुन्हा आमंत्रित करणारी निश्चितच ठरली आहे.
२०१२ साल जसजसे मावळतीला जात आहे, तसतशी बाजारातील वध-घट वाढीला लागली आहे. आगामी २०१३ सालाबाबत कितीही सकारात्मक व उत्साहपूर्ण आशा व्यक्त केल्या जात असल्या, तरी भलत्या उत्साहाने खरेदीला लागावे अशी कुणाचीही धारणा बनू नये. जोखीम इतकी घेऊ नका की ती उरावर बसून जीवच घेईल.
यापूर्वी या स्तंभात उल्लेख येऊन गेलेले एशियन पेंट्स, सिप्ला, कोलगेट, फेडरल बँक, गोदरेज कन्स्ट्रक्शन, आयएनजी वैश्य बँक, एमआरएफ, मदरसन सुमी, सन फार्मा, येस बँक नव्या उच्चांकाकडे अग्रेसर आहेत. गेल्या आठवडय़ात सुचविलेला ‘टय़ूब इन्व्हेस्टमेंट’चा समभाग सरलेल्या सोमवारी १७ टक्क्यांनी वाढला. अनेकांनी     भरपूर फायदा नक्कीच मिळविला असेल. सध्या मध्यमकालीन खरेदीसाठी श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स योग्य वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा