देशातील सातत्याच्या घोटय़ाळ्यामुळेच अर्थव्यवस्था ५ टक्क्यांच्याही खाली प्रवास करेल, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत व्यक्त करत टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. आर्थिक घोटाळ्यांबरोबरच महागाईवरही नियंत्रण मिळविण्यात सरकार यश येत नसल्याबद्दल त्यांनी सिंगापूरमधील व्यवस्थापन विद्यापीठात नाराजी व्यक्त केली. या सर्वाचा परिपाक म्हणूनच देशाची अर्थव्यवस्था आणखी दोन – एक वर्षे तरी ७ टक्क्यांच्या आसपासच असेल, असेही मत व्यक्त केले. २००८-०९ च्या जागतिक आर्थिक मंदीपूर्वीचा देशाचा ८ टक्के विकास दर तूर्त तरी नजरेच्या टप्प्यात नाही, असेही ते स्पष्टपणे म्हणाले. भारतीय हवाई हद्दीत पुर्नप्रवेश करण्यासाठी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाच द्यावी लागेल, असे सध्याच्या सरकारद्वारा सूचित करण्यात आले होते, असे मत जाहीर करून टाटा यांनी काही महिन्यांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. सरकारच्या निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळेच टाटा मोटर्सचा सिंगूर प्रकल्प गुजरातेतील आणंद हलवावा लागल्याची बोचही त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य बिर्ला समूहाचे कुमारमंगलम बिर्ला यांनीही निर्णय क्षमतेच्या बाबतीत सरकारविरोधी सूर व्यक्त केला होता.