आर्थिक सुधारणांची आशा व्यक्त करत देशाचे पतमानांकन उंचावण्याचे संकेत देणाऱ्या अमेरिकी पतमानांकन संस्थेने आता भारताच्या बँक क्षेत्राबाबत इशारा दिला आहे. देशाच्या अर्थस्थिती सुधाराबरोबरच बँकिंग व्यवस्थेतील कमकुवतपणा नाहीसा केला तर पतमानांकन उंचावणे अधिक सुलभ जाईल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेचे विश्लेषक अत्सी शेठ यांनी म्हटले आहे की, वित्तीय धोरणांबाबत भारताने कठोर व्हायला हवे. त्याचबरोबर देशातील बँक क्षेत्राची अर्थस्थिती सुधारण्याच्या दिशेने अधिक गतीने पावले पडायला हवीत.
शेट म्हणाले की, पायाभूत सेवा आणि नियमनातील सुधारणांच्या जोरावर देशाने विकास साधायला हवा. महागाईवर नियंत्रण आणि विकास दरातील वाढ याकडेही लक्ष द्यायला हवे. हे सारे घडून आल्यास भारताच्या पतमानांकनात आगामी कालावधीत सुधारणा दिसून येऊ शकेल.
‘मूडीज’ने गेल्याच आठवडय़ात भारताचा गुंतवणूकविषयक दर्जा सध्याच्या ‘स्थिर’वरून ‘सकारात्मक’ करण्याचा संकेत दिले होते. आर्थिक सुधारणा प्रत्यक्षात दिसल्यास येत्या वर्ष-दीड वर्षांत पतमानांकन सुधारू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले होते. भारताला सध्या पतमानांकन संस्थेमार्फत ‘बीएए३’ असा दर्जा आहे. शेट यांनी नव्या मुलाखतीत, भारतीय बँक व्यवस्थेतील मालमत्ता गुणवत्ता आणि भांडवली स्तर उंचावण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. देशाच्या पतमानांकनाबाबत हेच क्षेत्र जोखमीचे ठरू शकते, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. देशातील सार्वजनिक बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाची चिंता केंद्र सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेनेही यापूर्वी वाहिली आहे.

Story img Loader