जागतिक आणि आशियाई भांडवली बाजारात वाताहतीला कारणीभूत ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीतील पडझड मंगळवारच्या व्यवहारातही सावरताना दिसली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीपेक्षा पुरवठा कैक अधिक प्रमाणात जास्त होण्याच्या परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीने एप्रिल २००९ पातळीवर म्हणजे प्रतिपिंप ५० डॉलरखालील स्तराला फेर धरला.
‘ओपेक’ राष्ट्रांमधील दुसरा मोठा तेल-उत्पादक देश असलेला इराक त्याचप्रमाणे रशियामधून यंदा विक्रमी उत्पादन येण्याचे संकेत मिळत आहेत. इराकमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर म्हणजे १९८० नंतर तेलाचे सर्वाधिक उत्पादन घेतले गेले आहे; तर दुसरीकडे मंदावलेल्या जागतिक अर्थकारणापायी तेलाला पूर्वीइतकी मागणी राहिलेली नाही, तर सर्वात मोठा तेल आयातदार अमेरिकेचे तेलाबाबत वाढते स्वावलंबन पाहता, आंतरराष्ट्रीय पुरवठय़ाचे प्रमाण मागणीपेक्षा खूप अधिक राहण्याच्या भीतीने वायदा बाजारातील व्यवहारात कच्च्या तेलाचे दर सोमवारच्याच व्यवहारात पाच टक्क्य़ांनी गडगडले होते, त्यात मंगळवारी आणखी भर पडली.
ब्रेन्ट क्रूडच्या दरांनी मंगळवारी प्रतिपिंप ५२.२८ डॉलर असा नवीन नीचांक नोंदविला. तर यूएस क्रूड एप्रिल २००९ मधील ४९.३२ डॉलरचा तळ दाखविल्यानंतर काहीसे सावरले. तरी ५० डॉलरखाली म्हणजे प्रतिपिंप ४९.६३ डॉलरच्या स्तरावर त्यात व्यवहार सुरू होते.
अमेरिकेत ज्या गतीने तेलाच्या उत्पादनात नवनवीन भर पडत आहे, ते पाहता कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रतिपिंप ४० डॉलरखालचा स्तरही दाखवू शकतील, असा विश्लेषकांचे कयास आहेत. या परिणामी जगभरात सर्वच भांडवली बाजारात सोमवारी आणि मंगळवारीही मोठी पडझड दिसून आली, तर सर्वाधिक नुकसान ऊर्जा निर्देशांकात सामील कंपन्यांच्या समभागांना सोसावे लागले आहे.

विश्लेषकांच्या प्रतिक्रिया :
* जागतिक स्तरावर भांडवली बाजारांमधील नरमाई गेल्या काही दिवसांपासून कायमच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांमधील मोठय़ा प्रमाणातील आपटी आणि युरो झोनमधून ग्रीसची बाहेर पडण्याची शक्यता यामुळे येथील बाजारात अधिक चिंतेचे वातावरण मंगळवारच्या आपटीने अनुभवले गेले.
– राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलियो.
* मंगळवारी येथील बाजारांवर घसरत्या कच्च्या तेलाच्या किमती व ग्रीस येथील राजकीय वातावरणाची धास्ती निश्चितच उमटली. तर भारताप्रमाणेच चीनसारख्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावत आहे. बाजारासाठी अत्यंत अस्थिरतेसह नव्या वर्षांची सुरुवात झाली आहे.
– विनोद नायर, संधोधक प्रमुख, जिओजित बीएनपी पारिबा
eco03* जागतिक भांडवली बाजारांमुळे येथे मोठी मात्र आश्चर्यजनक आपटी मंगळवारी नोंदली गेली. ग्रीसमधील संभाव्य राजकीय घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमाल घसरत्या किमतींमुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असल्याचे चित्र या माध्यमातून दिसत आहे. भारतासाठी कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती या पथ्यावरच पडणार आहेत. नजीकच्या दिवसांमध्ये बाजारात संमिश्र चित्र दिसेल. केंद्रीय अर्थसंकल्पाव्यतिरिक्तही केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणा कार्यक्रम कायम राहील, अशी आशा आहे. दीर्घ कालावधीसाठी देशाचे पतमानांकन उंचावण्यासाठी व्याजदरातील कपात लाभदायी ठरू शकते.
– दिपेन शाह, कोटक सिक्युरिटीज.
* ग्रीसचा परिणाम भांडवली बाजारावर जाणवला असला तरी कच्च्या तेलांच्या घसरत्या किमतीमुळे विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांना अधिक अस्वस्थ केले आहे. तथापि भारताच्या चालू खात्याची तूट कमी होण्यास यातून मदत मिळेल. त्याचबरोबर इंधन महागाई कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
– ललित ठक्कर, एंजल ब्रोकिंग
* गेल्या काही दिवसांपासून येथील बाजाराचा कल हा वरच्या दिशेलाच होता. त्यामुळे त्यात कधी तरी घसरण अपेक्षितच होती. सध्याची स्थिती हा विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व मुख्यत: अमेरिकेतील संभाव्य व्याजदरवाढीच्या भीतीचा परिणाम दिसतो. याचा अर्थ बाजारातील तेजी संपली असा होत नाही. उलट गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे. निर्देशांक लवकरच नवे शिखर सर करेल.
– नोबुटाका किटाजिमा, मुख्य गुंतवणूक अधिकारी, एलआयसी नोमुरा
* ग्रीस सध्या सरकारी कर्ज-संकटात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कदाचित तो आपल्या इतर युरो सहयोगी देशांची मदत मागू शकतो. एकूणच ग्रीसमधील वातावरणाचा परिणाम येथील बाजारांवर झाला आहे.
– रघु कुमार, सह संस्थापक, आरकेएसव्ही ब्रोकरेज

Story img Loader