जागतिक आणि आशियाई भांडवली बाजारात वाताहतीला कारणीभूत ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीतील पडझड मंगळवारच्या व्यवहारातही सावरताना दिसली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीपेक्षा पुरवठा कैक अधिक प्रमाणात जास्त होण्याच्या परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीने एप्रिल २००९ पातळीवर म्हणजे प्रतिपिंप ५० डॉलरखालील स्तराला फेर धरला.
‘ओपेक’ राष्ट्रांमधील दुसरा मोठा तेल-उत्पादक देश असलेला इराक त्याचप्रमाणे रशियामधून यंदा विक्रमी उत्पादन येण्याचे संकेत मिळत आहेत. इराकमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर म्हणजे १९८० नंतर तेलाचे सर्वाधिक उत्पादन घेतले गेले आहे; तर दुसरीकडे मंदावलेल्या जागतिक अर्थकारणापायी तेलाला पूर्वीइतकी मागणी राहिलेली नाही, तर सर्वात मोठा तेल आयातदार अमेरिकेचे तेलाबाबत वाढते स्वावलंबन पाहता, आंतरराष्ट्रीय पुरवठय़ाचे प्रमाण मागणीपेक्षा खूप अधिक राहण्याच्या भीतीने वायदा बाजारातील व्यवहारात कच्च्या तेलाचे दर सोमवारच्याच व्यवहारात पाच टक्क्य़ांनी गडगडले होते, त्यात मंगळवारी आणखी भर पडली.
ब्रेन्ट क्रूडच्या दरांनी मंगळवारी प्रतिपिंप ५२.२८ डॉलर असा नवीन नीचांक नोंदविला. तर यूएस क्रूड एप्रिल २००९ मधील ४९.३२ डॉलरचा तळ दाखविल्यानंतर काहीसे सावरले. तरी ५० डॉलरखाली म्हणजे प्रतिपिंप ४९.६३ डॉलरच्या स्तरावर त्यात व्यवहार सुरू होते.
अमेरिकेत ज्या गतीने तेलाच्या उत्पादनात नवनवीन भर पडत आहे, ते पाहता कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रतिपिंप ४० डॉलरखालचा स्तरही दाखवू शकतील, असा विश्लेषकांचे कयास आहेत. या परिणामी जगभरात सर्वच भांडवली बाजारात सोमवारी आणि मंगळवारीही मोठी पडझड दिसून आली, तर सर्वाधिक नुकसान ऊर्जा निर्देशांकात सामील कंपन्यांच्या समभागांना सोसावे लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा