खनिज तेलातील दरांमध्ये पुन्हा एकदा उठाव पहायला मिळत आहे. कच्चे तेल प्रति िपप बुधवारी ६० डॉलरनजीक गेले. अमेरिकी विहिरींमधून इंधनाचे उत्पादन कमी होत असल्याने प्रमुख बाजारपेठ असलेल्या आखाती उत्पादक देशांमधील इंधनाला मागणी येण्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या नजीकच्या दिवसांतील व्यवहार आता ६० डॉलर प्रति पिंपने होऊ लागले आहेत. कच्चे तेल आता जवळपास गेल्या दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.

रुपया १५ पैशांनी भक्कम
गेल्या दोन व्यवहारांपासून घसरणाऱ्या भारतीय चलनाने बुधवारी १५ पैशांची वाढ नोंदविली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६२.३६ पर्यंत भक्कम बनला. ६२.३८ या वरच्या टप्प्यावर परकी चलन व्यासपीठावरील व्यवहाराची सुरुवात करणारा रुपया सत्रात ६२.३६ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्यात सोमवारच्या तुलनेत ०.२४ टक्के वाढ झाली.

तिसऱ्या टप्प्यातील कोळसा खाण लिलाव प्रक्रिया आठवडाभरात!
पीटीआय, नवी दिल्ली
कोळसा खाणींच्या लिलावातील दोन यशस्वी टप्पे पार केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया येत्या आठवडय़ापासून सुरू होण्याची शक्यता आहे. विविध २३ खाणींसाठी ही प्रक्रिया पार पडेल. पैकी १२ खाणी या ऊर्जा तर ११ खाणी या बिगर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहेत. यापूर्वी हा लिलाव मे महिन्यात होणार होता. मात्र आता तो येत्या आठवडय़ातच होईल, अशी शक्यता कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी वृत्तसंस्थेजवळ व्यक्त केली. तिसऱ्या टप्प्यातील अनेक खाणींसाठी सरकारने मंजुरी दिल्याचेही ते म्हणाले. यापूर्वीच्या दोन टप्प्यांमध्ये २९ कोळसा खाणींसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. याद्वारे सरकारला २ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

‘सीआयआय’द्वारे राष्ट्रीय बँकिंग तंत्रज्ञान परिषद २१ एप्रिलला मुंबईत
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />देशाची आर्थिक राजधानी मुंबईत येत्या २१ एप्रिलला भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’च्या वतीने बँकिंग तंत्रज्ञानविषयक राष्ट्रीय परिषद ‘बँकिंग टेक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेच्या यंदाच्या नवव्या आवृत्तीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान प्रमुख पाहुणे असतील, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याधिकारी एन. पी. होटा यांचीही परिषदेला उपस्थिती असेल.
नव्या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून बँकिंग सेवांचे विस्तारलेले दालन, बँकांमधील हे डिजिटल परिवर्तन, नवनवीन पेमेंट मंचाची निर्मिती व नावीन्यता, डिजिटल बँकिंगमधील नकारात्मक बाबी हे विषय परिषदेतील चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

Story img Loader