आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही देशाला बहाल झालेला मोठा नजराणा असल्याचे प्रतिपादन करीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आगामी दोन-तीन वर्षांत चीनला मागे टाकून जगातील सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताला स्थान मिळविता येईल, असा आशावाद व्यक्त केला.
पुढील दोन-तीन वर्षांत आर्थिक विकास दराबाबत आपण चीनच्या पुढे मजल मारू शकू. २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये आपण जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनून पुढे येऊ, असा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी यांनी येथे बुधवारी सायंकाळी ब्राऊन युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित समारंभात बोलताना विश्वास व्यक्त केला.
विद्यमान २०१४ साल हे नवीन कलाटणी देणारे आणि अत्यंत भाग्यवान वर्ष असल्याचे नमूद करून अंबानी म्हणाले, ‘‘मला वाटते भारतीय जनतेने ३० वर्षांत पहिल्यांदा आपले मत व्यक्त केले आहे. मी गेली ३०-३५ वर्षे व्यवसायात आहे आणि प्रथमच स्पष्ट बहुमताचे सरकार बनलेले पाहत आहे.’’
कच्च्या तेलाच्या किमतीतील जागतिक घसरणीकडे निर्देश करीत ते म्हणाले, ‘‘६०ते ७० अमेरिकी डॉलरच्या वेशीवर ते पोहोचणे ही खरेच देशाला मिळालेला मोठी भेट आहे. हे पुढे आणखी दोन वर्षे सुरू राहिले तर तो मौल्यवान नजराणा ठरेल.’’ तेलाच्या किमती २००४ सालातील प्रति पिंप २० डॉलरवरून १४० डॉलपर्यंत भडकल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader