आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती या भारतासारख्या देशासाठी लाभाच्या ठरणाऱ्या असून यामुळे देशाच्या वार्षिक तेल आयात खर्चात सुमारे ५० अब्ज डॉलरची कपात होऊ शकते, असे रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी म्हटले आहे. वर्षभरात होणारी ही बचत देशाच्या १६० अब्ज डॉलरच्या वार्षिक ढोबळ तेल आयातीपैकी एक तृतियांश आहे. मुंबईतील एका व्यवसाय व्यवस्थापन संस्थेत पटेल मार्गदर्शन करत होते. तर गुजरातेतील गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात रिझव्र्ह बँकेचे अन्य एक डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी तेलाचे कमी होणारे दर हे महागाईच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरू शकतील, असे प्रतिपादन केले. कच्च्या तेलाच्या दरातील घसरण ही देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेसाठी उभारी देणारी बाब आहे, असेही ते म्हणाले. व्याजदर कपातीबाबत या वेळी दोन्ही गव्हर्नरांनी कोणतेही भाष्य केले नाही. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या महिन्यातील पहिल्याच आठवडय़ात आहे.
उतार ४५ डॉलपर्यंत
वृत्तसंस्था: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलातील घसरण आता प्रति पिंप ४५ डॉलरवर पोहोचली आहे. मंगळवारी किमती सोमवारच्या तुलनेत ३.१३ डॉलरने कमी झाल्या. कच्च्या तेलाचे दर जून २०१४ पासून तब्बल ५८ टक्क्यांनी घसरले आहेत. सातत्याने घसरत असलेल्या तेल दराने साडेपाच वर्षांचा नवा तळ गाठला आहे. तेल उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ने मंगळवारी झालेल्या बैठकीत जागतिक स्तरावरील मोठय़ा प्रमाणात घसरणाऱ्या तेल किमतींना आवर घालणे अशक्य असल्याचेही मत व्यक्त करीत अमेरिकेने तेल उत्पादन कमी करावे असा आग्रह धरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा