केंद्रीय अर्थमंत्र्यांसह रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनीही वेळोवेळी जाहीरपणे अंदाजलेल्या मात्रेपेक्षा चिंताजनकरीत्या अधिक दर नोंदवीत, चालू खात्यातील तूट ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ तिमाहीत विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीत चालू खात्यातील तुटीचा हा दर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल ६.७ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
निर्यातीसह विदेशी निधीचा देशांतर्गत ओघ आणि देशाबाहेर जाणारा विदेशी चलनातील निधी यातील तफावत म्हणून चालू खात्यातील तूट ओळखली जाते. ही दरी अधिक रुंदावणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी भयंकर मानले जाते. जागतिक आर्थिक मंदीबरोबरच देशांतर्गत विपरित घडामोडींमुळे ही तूट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनली आहे. चालू खात्यातील तसेच जोडीला असलेली आयात-निर्यातीतील फरक म्हणून व्यापार तूटदेखील नियंत्रणात आणण्यावर केंद्र सरकारने वेळोवेळी प्राधान्य दिले आहे.
यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१२-१३ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)च्या तुलनेत ही तूट ४.६ टक्के राहिल, असे भाकित केले आहे. तर मार्च २०१३ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनीही वाढती तूट चिंताजनक असल्याचे प्रतिपादन केले होते. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी अपेक्षित असलेली ५ टक्के तूट येण्यास दोन आर्थिक वर्षे जाऊ द्यावे लागतील, असे भाष्य मुंबईतील व्याख्यानादरम्यान अलिकडेच केले आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ दरम्यान चालू खात्यातील तूट ६.७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.  चालू खात्यातील तूट रकमेमध्ये ऑक्टोबर – डिसेंबर २०११ मधील २०.१६ अब्ज डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबर – डिसेंबर २०१२ अखेर ३२.६३ अब्ज डॉलर झाली आहे. एरव्ही हा दर जीडीपीच्या तुलनेत ५ टक्क्यांभोवती राहण्याची शक्यता वर्तविली गेली असताना तो उच्चांकी टप्प्यावर असल्याचे आकडे रिझव्‍‌र्ह बँकेने अखेर जारी केले. वाढत्या तेल व सोने धातू आयातीमुळे तर निर्यातीलाही ओहोटी लागल्याने ही तूट चढी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीतील तूट ६१ टक्क्यांनी वधारली आहे. आधीच्या जुलै ते सप्टेंबर २०१२ या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत चालू खात्यातील तूट ५.४ टक्के राहिली आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या अर्धवार्षिकात ही तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.६ टक्के नोंदली गेली आहे. या तुटीबरोबरच डिसेंबर २०१३ अखेरच्या तिसऱ्या तिमाहीत व्यापारी तूटही वधारून ५९.६ अब्ज डॉलर झाली आहे.

वाढता वाढता वाढले.. विदेशी कर्ज
भारतावरील विदेशी चलनातील कर्जाचा भार ८.९ टक्क्यांनी वाढला आहे. मार्चच्या ३४५.५ अब्ज डॉलरच्या तुलनेत डिसेंबर २०१२ अखेर देशाबाहेरील कर्जाचे आकडे ३७६.३ अब्ज डॉलर झाले आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्याच्या कालावधीत हे कर्ज ३०.८ अब्ज डॉलरने वधारले आहे. दीर्घकालीन कर्जामुळे यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)च्या तुलनेत हे प्रमाण २०.६ टक्के आहे. वर्षभरापूर्वी डिसेंबर २०११ मध्ये भारतावरील विदेशी कर्ज ३३१.२ अब्ज डॉलर होते.

तिसऱ्या तिमाहीतील चालू खात्यातील तुटीचे आकडे आश्चर्यकारक नाहीत. मावळत्या एकूण आर्थिक वर्षांतच ही तूट अधिक राहण्याची शक्यता आहे. तिच्यावरील नियंत्रणाचे प्रयत्र्न  कायम असतील.
पी. चिदंबरम
केंद्रीय अर्थमंत्री

Story img Loader