दोन वेळा केलेल्या एकूण अर्धा टक्क्यांच्या रेपो दरकपातीचा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचविण्यास बँकांच्या चालढकलीवर रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या खरमरीत टीकेनंतरही देशातील आघाडीच्या बँकांनी कर्जावरील व्याजाचे दर इतक्यात कमी करता येत नसल्याचे म्हटले आहे. स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेने मात्र सायंकाळी उशिरा किमान ऋणदरात ०.१५ टक्के कपातीची घोषणा केली.
बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सर्वागाने विचार करता आणखी महिना-दोन महिन्यांचा अवधी दिल्यानंतरच कर्जाच्या व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला जाईल, अशी पतधोरणानंतर पत्रकारांशी बोलताना मंगळवारी सकाळी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या, ‘कर्जाच्या स्वस्ताईसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपैकी रेपो दर हा केवळ एक घटक आहे. या व्यतिरिक्त रोकड सुलभतेचे प्रमाण, कर्जाच्या मागणीतील उत्साह, स्पर्धात्मकता आणि निधी उभा करण्यासाठी येणारा खर्च या घटकांनाही विचार घेतले पाहिजे.’ या मताचीच री ओढत, खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी कर्जाच्या व्याज दरात कपातीसाठी रेपो दराव्यतिरिक्त अन्य घटकांचा पैलूही लक्षात घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्या उलट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अय्यर यांनी मात्र किरकोळ कर्जदारांना लवकरच त्यांच्यावरील हप्त्यांचा भार हलका झाल्याचे अनुभवता येईल, असे संकेत दिले. गेल्या तिमाहीपासून ठेवींवरील दरात कपात अनुभवास येत असून, आता कर्जावरील व्याज दरात कपातीचे पुढचे पाऊल टाकले जाण्यास बँकांना चालना मिळायला हवी, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा