दादर येथे ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या एक दिवसीय विनामूल्य कार्यशाळेत उपस्थित असलेल्यांपकी एक महिला उद्योगिनी शेअर उपदलाल स्मिता घांगुर्डे यानी सदर कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन नुकतेच मुलुंड येथे एक विनामूल्य सेमिनार आयोजित केले होते. गप्पा मारण्याच्या ओघात ‘व्यवसायाची वाढ कशी करावी’ याबाबत मला त्यांनी काही सूचना करण्यास सांगितले. ग्राहक हा राजा आहे हे कायम लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वर्तणूक ठेवा अशी सूचना मी केली. ओठावर गोड आणि नम्र भाषा तर हवीच पण आपल्या प्रत्येक कृतीतून ग्राहक आपल्यकडे आकर्षति तर होईल शिवाय तो टिकूनही राहील असे पाहा, असे मी त्यांना आवर्जून सांगितले. ग्राहक राजा आहे ही संकल्पना आताच्या काळात खूपच रूजली आहे. म्हणजे आपण एक महत्वाचा घटक आहोत ही गोष्ट ग्राहकाला उमजू लागली आहे. पण त्याचे राजेपण मान्य करण्याची मानसिकता अजून बऱ्याच व्यावसायिकांकडे आहे काय याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. ग्राहकाचा संतोष हाच केंद्र िबदू मानणे हे आजच्या मार्केटिंगचे सूत्र असले तरी कित्येक दुकानदार त्यापासून कैक योजने दूर आहेत हे तितकेच खरे. शेवटी मार्केटिंग हे शिकून आत्मसात करण्यापेक्षा ते रक्तातच असणे हे जास्त महत्वाचे. याच वेळी सुमारे ४५ वर्षांपूर्वीचा एक किस्सा मला आठवला तो मी स्मिताताईना सांगितला.
१९६६ साली आम्ही गिरगावात राहात असू तेव्हाची गोष्ट. तिथे झारापकर फोटो स्टुडिओ नावाचा एक स्टुडिओ होता. मी नुकताच नवीन नोकरीवर रुजू होणार होतो. त्यासाठी तीन पासपोर्ट साइझचे फोटो काढण्यासाठी वरील स्टुडिओत गेलो. फोटो काढला व पसे दिले. फोटो घेण्यासाठी चार दिवसानंतर स्टुडिओत गेलो. तेव्हा स्टुडिओ मालकांच्या लक्षात आले की, त्यांनी चुकून तीन ऐवजी चार फोटो प्रिंट केले होते. चूक त्यांची होती त्यामुळे त्यांनी एका जास्त फोटोचे पसे माझ्याकडे मागणे शक्यच नव्हते. तसे ते त्यांनी मागितलेही नाहीत. पुढे काय होते याची मी वाट पाहात होतो. किंबहुना काय होऊ शकेल या विषयी माझ्या मनात तर्क सुरू होते. तितक्यात मालकांनी शांतपणे त्या पकिटातील एक फोटो बाहेर काढून त्याचे तुकडे तुकडे करून माझ्या समोर ते कचऱ्याचा डब्यात टाकून दिले! वस्तुत: एवी तेवी त्या चौथ्या फोटोच्या प्रिंटिंगसाठी जो काही थोडासा खर्च झाला होता तो भरून येणार नव्हताच. मग तो फोटो फाडून टाकण्यापेक्षा त्यांनी मला दिला असता तर? इतका दिलदारपणा झारापकरांनी दाखविला असता तर मी कायमचा त्यांच्या दुकानाशी ग्राहक म्हणून जोडला गेलो असतो. कदाचित मी त्याचे त्यांना पसेही दिले असते. कारण फोटो काय पुन्हा कधी तरी लागतोच. शिवाय कुणाचे उगीच फुकट कशाला घ्या? ही मराठी मध्यमवर्गीय मानसिकता! किंबहुना त्यांनी तो चौथा फोटो नुसता बाजूला काढून स्वतकडे ठेवून दिला असता तरी हरकत नव्हती. नाही तरी स्टुडिओत टेबलावर काचेखाली अनेक फोटो विराजमान झालेले असतातच त्यात माझा एक! (असे मी समजलो असतो). प्रत्यक्षात नंतर त्यानी तो फाडून टाकला असता तरीही ते मला कळले नसते. पण चक्क तो फोटो माझ्यासमोर फाडून टाकून ‘नाही मला, नाही तुला, घाल कुत्र्याला!’ ही म्हण त्यांनी सार्थ केली.
आज पंचेचाळीस वर्षांनंतर हे सर्व आठवले की हसू येते.
ताजा कलम : नुकतेच गिरगावात जाण्याचा योग आला. काळाच्या ओघात सदर स्टुडिओ केव्हाच काळाच्या पडद्याआड गेला आहे. तसा तो स्टुडिओ बंद होणारच होता हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. कारण माझ्या समक्षच एक तरुण महाविद्यालयीन मुलगा त्याच वेळी फोटो घेण्यासाठी आला होता व त्याने शंभर रुपयाची नोट कॅशिअरला दिली. तेव्हा चार रुपयाला तीन फोटो मिळत असत. आता चार रुपयांच्या बिलासाठी शंभरची नोट दिली हा त्या तरुणाने मोठा गुन्हा केला होता अशी ठाम समजूत होती झारापकरांची! ‘शंभरची नोट काढू हीरोगिरी करतोस काय?’ हे वक्तव्य व्यवसाय वाढीसाठी किती उपयुत्त आहे नाही!! एकूण काय तर मार्केटिंगची कितीही पुस्तके वाचली किंवा कोस्रेस केले तरीदेखील या सर्वाहून परिणामकारक असे काहीतरी मुळातच असावे लागते! आणि ते शिकूनही येईलच असे नाही. कै. पु.ल. देशपांडे यानी एक मार्मिक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, अख्खी तर्खडकर इंग्रजी व्याकरणमाला कोळून प्याली तरी, ‘उद्या आमचेकडे सर्वपित्री अमावास्येनिमित्त पितरांना तर्पण करायचे असल्याने एक दिवसाची कॅज्युअल रजा मंजूर करावी’ असा अर्ज साहेबाकडे लिहून देता येत नाही!
ग्राहक राजा आणि व्यवसायाची वाढ
दादर येथे ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या एक दिवसीय विनामूल्य कार्यशाळेत उपस्थित असलेल्यांपकी एक महिला उद्योगिनी शेअर उपदलाल स्मिता घांगुर्डे यानी सदर कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन नुकतेच मुलुंड येथे एक विनामूल्य सेमिनार आयोजित केले होते.
आणखी वाचा
First published on: 30-11-2012 at 05:39 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer is king and business development