टाटा समूहातील आदरातिथ्य व्यवसाय असलेल्या दि इंडियन हॉटेल्स कंपनीचे नामनिर्देशित अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री यांची नियुक्ती मंगळवारी करण्यात आली. सध्या ते कंपनीचे अतिरिक्त संचालक आहेत. रतन टाटा हे इंडियन हॉटेलच्या अध्यक्षपदावरून २८ डिसेंबर २०१२ रोजी पायउतार होणार आहेत.
इंडियन हॉटेल्स मार्फत ताज महाल पॅलेस अ‍ॅण्ड टॉवर, विवान्ता ताज प्रेसिडेन्ट ही हॉटेल्सची शृंखली चालविली जाते. कंपनीमार्फत नुकताच ओरिएन्ट एक्स्प्रेसच्या खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यात सध्या इंडियन हॉटेल्सचा ७ टक्के हिस्सा आहे. २००६ पासून दुसऱ्यांदा टाटा सन्सच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले मिस्त्री यांची नोव्हेंबर २०११ मध्ये रतन टाटा यांचे वारसदार म्हणून नाव घोषित करताना, टाटा सन्सचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मिस्त्री यांची टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स तसेच टीसीएस या समूहातील अन्य कंपन्यांच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. टाटा ग्लोबल बेव्हरेजेसच्या अध्यक्षपदावरूनही टाटा हे आजपासूनच (२० नोव्हेंबर) पायउतार झाले. येथेही मिस्त्री यांची तातडीने अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही मुंबई शेअर बाजाराला देण्यात आली. डिसेंबर २०१२ पर्यंत टाटा हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असतील.

Story img Loader