३,८०० एकरांवर कंत्राटी लागवडीचे नियोजन
दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या वनौषधींचे पुनरूज्जीवन करत त्यांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी बनण्याकडे ‘डाबर’ने वाटचाल सुरू केली असून २०१६-१७ या आर्थिक वर्षांत देशभरात ३,८०० एकर जमिनीवर या दुर्मिळ वनौषधींच्या लागवडीचे तिचे नियोजन आहे. यासाठी देशातील शेतकऱ्यांनाच कंपनी वनौषधींची रोपे देणार असून त्यांच्याकडून वाढ झालेली वनस्पती स्वत: विकत घेणार आहे. यातूनच, लेह-लडाख मधील शेतकऱ्यांचे लष्कराशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी ‘डीआरडीओ’च्या मागणीनुसार कंपनीने ४५ हजार वनौषधींचा पुरवठा केला आहे.
आयुर्वेदिक औषधी उत्पादनांच्या क्षेत्रातील डाबर इंडिया लिमिटेडने दुर्मिळ वनौषधींचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यास सुरूवात केली असून २०१५-१६ या आर्थिक वर्षांत साडेसात लाख औषधी रोपांची उत्पादने १८०० शेतकऱ्यांना कंपनीने वितरीत केली होती. कंत्राटी पद्धतीने उत्पादने तयार करण्यात येत असून कंपनी शेतकऱ्यांना लहान रोप मोफत देते व शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर उगवलेली मोठी रोपे कंपनी विकत घेते.
यंदा शेतकऱ्यांची संख्या ही वाढणार असून २,२०० शेतकऱ्यांच्या मिळून ३,८०० एकर जमिनीवर या वनौषधींचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळत असून यंदा कंपनी साडेसात लाखाहून अधिक वनौषधींचे उत्पादन करणार आहे. अशी माहिती कंपनीचे जैव संसाधन विकास विभागाचे प्रमुख डॉ. बाबा यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ‘डीआरडीओ’ला ४५ हजार वनौषधींची रोपे पुरवण्यात आली असून, लष्करामार्फत ही रोपे लेह-लडाखमधील शेतकऱ्यांना पुरविली जात आहेत. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असून काश्मीर व लडाख येथील सध्याचे चित्र बदलण्यासाठी लष्कराने उचलेले हे प्रमुख पाऊल मानले जात आहे. स्थानिकांना त्यांच्या उत्पादनासाठी ‘डाबर’चे शास्त्रज्ञ मदत करत असल्याचे डॉ. बाबा यांनी सांगितले.
सामाजिक सुधारणा
‘डाबर’मार्फत गावे हागणदरी मुक्त करण्यासाठी उत्तराखंड येथील रूद्रपूरमधील खेडा व बीआरसी या शाळांमध्ये १२ शौचालये बांधली असून त्याचा १ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. तसेच, २०१५-१६ या एका वर्षांत १ हजार ४८ शौचालये बांधण्यात आली असून या वर्षांत १२०० शौचालये बांधणार असल्याचे कंपनीचे अंमलबजावणी विभागाचे प्रमुख सुशील कुमार यांनी सांगितले.
कंपनीच्या ‘संदेश’ या विभागामार्फत उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यात १६ स्त्री-शक्ती केंद्र चालवण्यात येत असून औपचारिक शिक्षण केंद्र, प्रौध साक्षरता केंद्र आदींचाही यात समावेश असल्याचे कुमार यांनी सांगितले.
कोणत्या वनौषधी?
आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व नामशेष होत असलेल्या १९ वनौषधींचे सध्या ‘डाबर’ उत्पादन घेत आहे. यात नेपाळमध्ये संशोधित ‘आकारकारा’ व ‘चिरायता’, तसेच गंगेच्या खोऱ्यात आढळणारी ‘पृष्टपर्णी’ वनस्पतीचा समावेश असून त्यांचे औद्योगिक उत्पादन करण्यात येत आहे. नेपाळसह हिमाचल प्रदेश, राजस्थान, काश्मीर, गुजरातसह एकूण आठ राज्यांमधील शेतकऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीने या वनस्पतींचे उत्पादन घेण्यात येते. उत्तराखंड येथील पंतनगर येथे कंपनीचे ‘स्वयंचलित ग्रीन-हाऊस’ असून तेथून वर्षांला साडेसात लाख रोपांची निर्मिती होते.

Story img Loader