केव्हाही, कधीही आणि कुठेही या तीन शब्दांनी माहितीचे एक नवे डिजिटल जग उभे केले असून या नव्या डिजिटल जगावरच यंदाच्या नासकॉमच्या वार्षिक अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यात डेटा ते सोशल मीडिया या सर्व मुद्दय़ांचा समावेश असेल.
१२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत सांताक्रूझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे अधिवेशन होणार आहे. डिजिटल व्हा, अन्यथा नष्ट व्हा, असेच नव्या जगात म्हटले जाते. ते खरेही आहे, असे सांगून नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणाले की, म्हणूनच या नव्या जगातील नव्या गोष्टी या क्षेत्रातील उद्योजक आणि साऱ्यांनाच लक्षात याव्यात म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या विषयातील आव्हाने आणि संधी या दोन्हींचा विचार या सत्रांमध्ये होणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे वारे वाहत असतानाच दुसरीकडे अर्थव्यवस्था मात्र अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. या अशा प्रसंगी उद्योगांनी आणि उद्योजकांनी काय करावे यावरही या अधिवेशनात भर देण्यात येणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था व उद्योग यावरही या अधिवेशनात येणारे मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
यापुढील काळात अर्थव्यवस्था हीदेखील माहिती तंत्रज्ञानाधारितच असणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हेच माध्यम असेल. अधिवेशनातील काही सत्रांमध्ये प्रामुख्याने याच विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून अधिवेशनातील व्याख्यात्यांमध्ये एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अँडी मॅकफी, युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे डॉ. अनिल गुप्ता, मॅकेन्सी अ‍ॅण्ड कंपनीचे नोशीर काका, विप्रोचे सीईओ टी. के. कुरिअन, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे सीआयओ स्टुअर्ट मॅकगुइगन, सिस्कोचे अध्यक्ष जैमी वेल्स आदींचा समावेश आहे.

Story img Loader