विजय मल्ल्यांकडून ४२५ कोटींची तयारी
किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या हे कंपनीत ४२५ कोटी रुपयांचे भांडवल ओतण्यास तयार असून लवकरच कंपनीची काही उड्डाणे सुरू होण्याची माहिती कंपनीला कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने दिली.
देशातील हवाई क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर एथियादमार्फत किंगफिशरमधील हिस्सा विक्रीच्या चर्चेला ऊत आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मल्ल्या यांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त होत असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
किंगफिशरला १,५०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेसह १७ विविध बँकांच्या तसेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक झाली. बैठकीला किंगफिशरचे मुख्य वित्तीय अधिकारी रवि नेदुंगडी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल हे उपस्थित होते. या बैठकीनंतर स्टेट बँकेच्या कंपनी विभागाचे उप व्यवस्थापकीय संचालक श्यामल आचार्य यांनी सांगितले की, मल्ल्या यांनी कंपनीत ४२५ कोटींचे भांडवल ओतण्याची तयारी दर्शविली असून नागरी हवाई महासंचलनालयाच्या परवानगीनंतर किंगफिशर काही मर्यादित उड्डाणेही सुरू करू शकते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision on kingfisher is on today