जनसामान्यांच्या आर्थिक जीवनात अढळ स्थान असलेल्या बँकांचे चित्रपट तारे-तारकांकडून ‘प्रमोशन’ सध्या बऱ्यापैकी रुळले असताना, आजवर यापासून अलिप्त राहिलेल्या देशातील खासगी क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेनेही अखेर तीच री ओढली आहे. आपल्या स्थापनेनंतरच्या दोन दशकात प्रथमच आपल्या प्रचार-प्रसारासाठी वलयांकित व्यक्तीला सामावून घेतले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोनला बँकेने आपल्या नव्या ब्रॅण्ड मोहिमेसाठी सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले आहे. एक ग्राहककेंद्रित बँक म्हणून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बँकेने आणलेले सेवा नावीन्य आणि विविध सोयीसुविधांमध्ये आजवर केलेल्या प्रगतीचा पाठ दीपिका विविध जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपुढे आणेल. ‘बढने के कई नाम है’ असा आशय घेऊन लोवे लिन्टास या संस्थेच्या संकल्पनेवर बेतलेल्या या दीपिका अभिनीत जाहिरातपटांचे दिग्दर्शन गौरी शिंदे हिने केले आहे. सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांसारख्या हिंदी फिल्म तारे-तारकांसह, बॅडिमटनपटू सानिया नेहवाल बडय़ा बँकांच्या जाहिरांतीमध्ये झळकताना दिसल्या आहेत. मराठीतील अभिनेते सचिन पिळगांवकर, दिलीप प्रभावळकर आदींना राज्यातील अग्रणी सहकारी बँकांचे सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले गेले आहे.

Story img Loader