तिहार तुरुंगात खितपत पडलेल्या सहारा समूहाचे प्रमुख सुब्रता रॉय यांना प्राप्तिकर चुकवल्याच्या प्रकरणी न्यायालयात हजेरी लावण्यापासून मोकळीक देणारा दिलासा दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. सत्र न्यायालयाने याप्रकरणी बजावलेल्या वॉरन्टला स्थगिती देण्याबरोबरच दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीही २५ मेपर्यंत स्थगित केली आहे. रॉय यांच्या बरोबरीनेच, त्यांच्या समूहातील सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लि.चे संचालक जे बी रॉय, रानोज दास गुप्ता आणि ओ पी श्रीवास्तव यांना हजेरीची गरज नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन सिंग यांनी आदेशात म्हटले आहे. प्राप्तिकर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने रॉय यांना १५ एप्रिल रोजी नियोजित सुनावणीसाठी हजर करण्याचे वॉरन्ट तिहार तुरुंग प्रशासनाला दिले होते. त्याला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणारा अर्ज रॉय यांच्या वकिलांनी केला होता.

Story img Loader