मूल्यऱ्हासाचे सलग तिसरे वर्ष
गुंतवणूक आणि खरेदी म्हणूनही मौल्यवान धातूचे आकर्षण कमीच राहिल्याचे सरत्या वर्षांने दाखवून दिले. सरकारच्या तिजोरीवरील भार म्हणून सोन्याच्या आयातीवरील र्निबध संपूर्ण वर्षांत कायम राहिल्यानंतर तसेच सोनेविषयक नव्या बचत योजना अखेरच्या टप्प्यात येऊनही सोन्याचा दर तोळ्याला २७ हजारांपर्यंतही जाऊ शकला नाही. उलट वर्षभरात सोने दर प्रति १० ग्रॅममागे १,००० रुपयांनी कमी झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षांत सोन्याचे दर घसरले आहेत.
२०१५ची अखेर अंतिम टप्प्यात असतानाही सोन्याचे दर १० ग्रॅममागे २५ हजारानजीकच रेंगाळत आहेत. २०१५च्या सुरुवातीला सोन्याचे दर तोळ्यासाठी २६,७०० रुपये होते, तर चांदीचा किलोचा भाव सुरुवातीच्या ३७,२०० रुपयांवरून आता ३४,५०० नजीकच आहे.
२०१५ मध्ये सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी रोडावले आहेत. तर पांढरा धातू, चांदीचे किलोचे भावही संपूर्ण २०१४च्या तुलनेत ८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. आतापर्यंत सोन्याने ३४,००० रुपये तर चांदीने ७५ हजार रुपयांपर्यंतचा सर्वोच्च दर गाठला आहे.
२०१५च्या सुरुवातीपासूनच अटकळ असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या संभाव्य व्याज दरवाढीच्या अंदाजावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याचे दर कमालीचे घसरले. २०१५च्या अखेरच्या महिन्यात तर दर लंडनच्या बाजारात प्रति औन्स १,१०० डॉलपर्यंत उतरले.
भारतातील मान्सून स्थितीनेही मौल्यवान धातूच्या मागणीला यंदा साथ दिली नाही. त्यातच ऐन दिवाळीला सादर झालेल्या सरकारच्या सुवर्ण मुद्रणीकरण योजनांनीही परताव्याच्या दृष्टीने फार आकर्षकता नव्हती. सुवर्ण वायदा व्यवहार निधी (ईटीएफ) मधील गुंतवणूकही या वर्षांत कमी झाली.
कमी मागणीमुळे देशाची सोने निर्भरताही यंदा आखडली. ऐन सणाच्या- नोव्हेंबरमध्ये भारताची आयात ३६.४८ टक्क्यांनी कमी होत ती अवघ्या ३.५३ अब्ज डॉलरवर आली, तर चांदीची आयात तब्बल ५५ टक्क्यांनी कमी होऊन २८.५० कोटी डॉलपर्यंत राहिली.
दशकातील तळही दाखविला!
* तोळ्यासाठी २८,२०० रु. असा सर्वोच्च दर सोन्याने वर्षांच्या सुरुवातीला- जानेवारीमध्येच गाठला होता. ग्रीसमधील राजकीय उलथापालथीचा तो परिणाम होता.
* २०१५ सालात जुलैमध्ये पिवळा धातू २४,६०० पर्यंत खाली आला. २०११ नंतरचा हा सोन्याचा तळ होता.
* याच वेळी १९९९ नंतरचा सलग सात आठवडय़ांचा घसरता क्रमही सोन्याने दाखविला.
* मात्र जुलैअखेर सोने पुन्हा जानेवारीतील २७,२५० रु. अशा वरच्या टप्प्यानजीक गेले.
* सोने २८ ऑगस्ट २०१३ मध्ये तोळ्यामागे ३३,७९० रु. अशा सार्वकालिक उच्चांकावर होते.
* २००३ ते २०१२ दरम्यान सोन्याने मूल्यवाढीत दमदार कामगिरी बजावली आहे.