‘एम गव्हर्नन्स’ची नांदी देत डिजिटल इंडिया उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या मुहूर्तमेढीचे उद्योगक्षेत्राकडून उत्स्फूर्त स्वागत केले. माहिती तंत्रज्ञानाची जोड असलेल्या या उपक्रमासाठी कोटय़वधी रुपयांच्या गुंतवणुकीचे इमलेही उपस्थित उद्योजकांनी बांधले. १८ लाख रोजगार निर्मिती करू पाहणाऱ्या या उपक्रमात ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
येत्या आठवडय़ात प्रत्यक्षात सुरू होणाऱ्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सर्व सरकारी योजना तसेच कामकाज एकाच व्यासपीठाशी संलग्न होणार आहेत. त्याचा शुभारंभ बुधवारी नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी उपस्थित अनेक उद्योजकांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीचे आकडेही लगोलग जाहीर केले.
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजने डिजिटल क्षेत्रात २.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर या क्षेत्रात ५ लाख रोजगारनिर्मिती होईल, असेही अंबानी या प्रसंगी म्हणाले.
४,००० रुपयांमध्ये ४जी तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल सेवेची घोषणा रिलायन्सने यापूर्वीच केली आहे. त्यासाठी जिओ डिजिटल इंडिया स्टार्ट अप फंड सुरू करण्याची घोषणाही रिलायन्सने केली. १६ अब्ज डॉलरची कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमची स्वस्तातील मोबाइल सेवा डिसेंबरपासून देशभरातील १.५० लाखांहून अधिक दालनांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहदेखील ६०,००० तंत्रज्ञांची भरती करेल, असे जाहीर केले.
डिजिटल क्षेत्रात येत्या पाच वर्षांत १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे भारती एन्टरप्रायजेसचे सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे.
‘आयडिया सेल्यूलर’द्वारे मोबाइल क्षेत्रात अस्तित्व असलेल्या आदित्य बिर्ला समूहाने दूरसंचार जाळे विस्तारण्यासाठी तसेच पायाभूत सेवांवरील खर्च म्हणून येत्या पाच वर्षांत ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.
अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स-एडीएजी’ समूहाद्वारेही येत्या काही वर्षांमध्ये डिजिटल, क्लाऊड, दूरसंचार आदींसाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे घोषित करण्यात आले. डिजिटल इंडिया उपक्रमातील डिजिटल लॉकर या ऑनलाइन फाइल सुविधेसाठी या वेळी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक नोंदणी करून घेतली.
तैवानच्या डेल्टा इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंग चँग यांनीही ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यास रस दाखविला आहे.
देशातील २.५ लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडणाऱ्या वेदांता समूहातील स्टरलाइट टेक्नॉलॉजीजचे बिगर कार्यकारी अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने फायबर व केबलनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची तयारी दाखविली.
ल्लसरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशातील ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षण क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात संधी निर्माण होतील. या क्षेत्रात यातून रोजगारातही वाढ होईल. या माध्यमातून भारत खऱ्या अर्थाने जोडला जाणार आहे. खेडय़ांचे नागरीकरण यामुळे घडून येईल. देशाला एकसंध राखण्यात त्यामुळे यश येईल.
– अनिल अगरवाल,
स्टरलाइट टेक्नॉलॉजीज
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा