सलग तेजी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सचा प्रवास लक्षात घेत मुंबई निर्देशांक डिसेंबर २०१५ अखेपर्यंत ३१ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज डॉइशे या जर्मन बँकेने व्यक्त केला आहे. मात्र बँकेने हा अंदाज आधीच्या ३३ हजारांवरून यंदा कमी केला आहे.
भारतात व्यवसाय वातावरणपूरक होत असून थेट निधीचा ओघ पूर्वपदावर येईल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे. याचबरोबर देशातील कंपन्यांचे वित्तीय निष्कर्षही येत्या दोन तिमाहीत अधिक आशादायी असतील, असेही बँकेने म्हटले आहे.
भारतात विदेशी निधीचा ओघ येण्यासाठी मात्र अमेरिकी फेडरल रिझव्र्हचे व्याजदर धोरण व जागतिक रोखे बाजारातील अस्थिरताही कारणीभूत होण्याची शक्यताही बँकेने आपल्या अहवालात वर्तविली आहे. चालू वर्षांच्या दुसऱ्या अर्धवार्षिकात भारताचा अर्थप्रवास रुळावर येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
डॉइशेप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय दलाल पेढय़ांनीही प्रमुख निर्देशांकाचा भविष्यातील प्रवास संकुचित अंदाजित केला आहे. सिटी समूहानुसार सेन्सेक्स डिसेंबरअखेर ३२,२०० वर येईल; तर एचएसबीसीच्या म्हणण्यानुसार सेन्सेक्स वर्षअखेर २६,९०० पर्यंत स्थिरावेल. उभय संस्थांचा यापूर्वीचा अंदाज अनुक्रमे ३३,००० व ३०,१०० होता. यूबीएसनेही निफ्टीचा यापूर्वीचा अंदाज ९,२०० वरून कमी करत आता डिसेंबर २०१५ साठी ८,६०० वर आणला आहे. ३२,५०० या टप्प्यावरील मॉर्गन स्टॅनलेचा अंदाज मात्र कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा