मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या उद्योगसमूहातील ‘कामधेनू’ कंपनी युनायटेड स्पिरिट्समधील अधिकांश हिस्सा हा डिआजियो पीएलसी या विदेशी मद्य कंपनीच्या ताब्यात गेला आहे. सुमारे दोन अब्ज डॉलर (साधारण १०,८०० कोटी रुपये) असा विदेशातून झालेला भारतातील सर्वात मोठा अधिग्रहण व्यवहार अखेर डिआजियोने शुक्रवारी तडीस नेला. कर्जाच्या ओझ्याखालील किंगरफिशर एअरलाइन्ससह मल्ल्या यांना यूबी उद्योगसमूहातील अन्य अडचणीतील कंपन्यांनाही तारून नेण्याची संधी या व्यवहाराने मिळवून दिली आहे. त्या उलट जॉनी वॉकर व्हिस्की, गिनीस बीअर आणि स्मिरनॉफ व्होडका या नाममुद्रांवर स्वामित्व असलेल्या डिआजियोला या व्यवहारातून भारतासारख्या जगातील सर्वात मोठय़ा व्हिस्की बाजारपेठेत आपले पाय भक्कम करता येणार आहेत. या सौद्याची अधिकृत घोषणा शेअर बाजारातील शुक्रवारचे व्यवहार आटोपल्यानंतर केली जाणार असली तरी, युनायटेड स्पिरिट्स (रु. १,३६०.५०), किंगफिशर एअरलाइन्स, युनायटेड ब्रुअरीज या यूबी समूहातील कंपन्यांनी ‘सेन्सेक्स’मध्ये तब्बल टक्क्यांहून मोठी घसरण झाली असतानाही चमकदार वाढ नोंदविली.

Story img Loader