गेल्या दहा वर्षांत प्रथमच देशातील डिझेल इंधनाची मागणी कमी झाली आहे. ऊर्जानिर्मितील वाढ आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हे घडून आल्याचे सार्वजनिक तेल कंपनी इंडियन ऑइलचे अध्यक्ष आर. एस. बुटोला यांनी म्हटले आहे. देशातील एकूण तेल उत्पादन मागणीपैकी डिझेलचा हिस्सा सर्वाधिक ४५ टक्के आहे. २००३-०४ पासून त्याची विक्री वर्षांला ६ ते ८ टक्क्यांनी वाढत आहे. यंदा मात्र हे प्रमाण ०.८ ते १ टक्क्यापर्यंत घसरले आहे. मोठय़ा प्रमाणातील मागणीपोटी ऊर्जा वितरण वाढले असून परिणामी जेनसेटसारख्या उपकरणांमध्ये होणारा डिझेलचा उपयोग कमी झाल्याने या इंधनाची मागणीदेखील कमी झाल्याचे बुटोला यांनी सांगितले. सध्या महिन्याला लिटरमागे ५० पैशांपर्यंत डिझेलचे दर वाढण्याचेही निमित्त इंधनाला मागणी कमी नोंदविण्यास भाग पाडत असल्याचे ते म्हणाले. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून सध्या डिझेलच्या किंमती वाढत आहेत. जानेवारीपासून डिझेलचे दर ६.६२ रुपयांनी कमी झाले आहेत. जून २०१० मध्येही इंधनाच्या किमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलचा वापर कमी झाला होता, अशी आठवण यानिमित्ताने बुटोला यांनी करून दिली. तूर्त पेट्रोलपेक्षा १० रुपयांनी स्वस्त असणाऱ्या डिझेलचा वापर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सातही महिन्यात कमी झाला आहे.