सध्या महिन्याला प्रति लिटर ५० पैशांनी वाढत असलेले डिझेलचे दर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वाढत्या अवमूल्यनामुळे नजीकच्या कालावधीत यापेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्याचे सरकार स्तरावर संकेत देण्यात आले आहेत.
सरकारचा अनुदानावरील भार कमी करण्याच्या प्रयत्नाचे समर्थन करताना पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार व रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांनी मार्च २०१४ पर्यंत डिझेलचे दर पूर्णपणे नियंत्रणमुक्त करण्याचा पुनरुच्चार करत सध्या प्रति महिना प्रति लिटर ५० पैसे दरवाढीपेक्षा अधिक प्रमाणातही दर वाढविले जाऊ शकतात, असा इशारा दिला.
डॉ. राजा जे. चेल्लीया स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने येथे आलेल्या रंगराजन यांनी सांगितले की, सरकारचा अनुदानावरील भार कमी करण्याचा प्रयत्न कायम असून त्यादिशेने अधिक कार्य करण्याची गरज आहे. अनुदान हे आवश्यकच आहे; मात्र इंधन वगळता ते व्हायला हवे. त्यासाठी पेट्रोलनंतर आता डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त होणे गरजेचे आहे. तेव्हा आगामी काही महिन्यांमध्ये या इंधनाचे दर हे बाजारनिहाय असतील. सद्य धोरणानुसार मार्चअखेपर्यंत डिझेलच्या किंमती वाढत राहतील.