दिवाळीचा महिना असलेल्या नोव्हेंबरमध्ये देशातील मोटरसायकल विक्रीने किरकोळ वाढ नोंदविली आहे. तुलनेत ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सवलतीनंतरही प्रवासी कारना सलग दुसऱ्या महिन्यात घसरत्या विक्रीला सामोरे जावे लागले आहे.
‘सियाम’ या वाहन उत्पादक संघटनेने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार,
नोव्हेंबरमध्ये मोटरसायकलची विक्री १.४४ टक्क्यांनी वधारली आहे. एकूण दुचाकीदेखील ५.५५ टक्क्यांनी उंचावली आहे. गेल्या महिन्यात ८,८०,०१५ मोटरसायकलची तर १२,४०,७३२ दुचाकींची विक्री झाली.
भारतात प्रवासी कारची विक्री गेल्या महिन्यात १,४२,८४९ झाली आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये ती अधिक, १,५५,५३५ होती. सलग दुसऱ्या महिन्यात प्रवासी कारची देशांतर्गत विक्री ८.१६ टक्क्यांनी कमी झाली आहे. संघटनेने एकूण वर्षांत विक्री नकारात्मक स्थितीत जाण्याची भीती यापूर्वीच व्यक्त केली आहे.
सर्व श्रेणीतील एकूण वाहनांची गेल्या महिन्यातील विक्री अवघ्या ०.९० टक्क्यांनी वाढली आहे. ती वर्षभरापूर्वीच्या नोव्हेंबरमधीलच १५,१२,८६९ वरून यंदा १५,२६,४३८ झाली आहे. अनेक कंपन्या त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती नव्या वर्षांपासून १० टक्क्यांपर्यंत वाढविणार आहेत.
दुचाकी    १२,४०,७३२     +५.५५%
मोटरबाईक    ८,८०,०१५     +१.४४%
कार    १,४२,८४९     -८.१६%
प्रवासी वाहने    २,०१,५२०     -१०.१८
एकूण वाहने    १५,२६,४३८     +०.९०

Story img Loader