दसऱ्यानंतर असणारा दिवाळीचा मोसमही वाहन कंपन्यांसाठी विक्रीच्या दृष्टीने फारसा काही लाभदायक ठरलेला नाही. नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरमधील दसऱ्याच्या तुलनेत झालेली वाहन कंपन्यांची विक्री वाढ संमिश्र स्वरुपात नोंदली गेली आहे. या कालावधीत मारुती, महिंद्रसारख्या कंपन्यांनी आघाडी घेतली आहे; तुलनेत त्यांच्याच कट्टर स्पर्धक अनुक्रमे ह्युंदाई आणि टाटा मोटर्सला मात्र वाहन विक्रीतील घट नोंदवावी लागली आहे.
मारुतीकडून पुन्हा एक लाखाचा टप्पा गाठला गेला आहे. अल्टो ८०० ला मिळालेला प्रतिसाद यंदाही कायम राहिला आहे. किंबहुना कंपनीच्या छोटय़ा प्रवासी कारनेही मारुतीला पुन्हा तिचे एक लाखावरील स्थान मिळवून दिले आहे. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावाजलेल्या मुळच्या कोरिअन ह्युंदाई कंपनीने यंदाच्या नोव्हेंबरमध्ये निर्यातीतील ५ टक्क्यांसह एकूण विक्रीतही २.२९ टक्क्यांची घट नोंदविली आहे. कोणे एके काळी निर्यातीत आघाडीवर असणाऱ्या या कंपनीची महिन्याला ७५ हजारांहून अधिक वाहन विक्री होत असे.
महिंद्रने गेल्या महिन्यात कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाहन व्रिक्री नोंदविली होती. कंपनीने सलग दुसऱ्या महिन्यात हा विक्रम राखला होता. एसयूव्ही श्रेणीतील आघाडीच्या या कंपनीच्या क्वांटो या छोटेखानी एसयूव्हीने हातभार लावला आहे. असे असूनही महिंद्रने निर्यात मात्र सुमार राखली आहे. महिंद्रची धास्ती घेतलेल्या टाटा मोटर्सला यंदा पु्न्हा घसरणीचा सामना करावा लागला आहे. ऐन दिवावळीच्या नोव्हेंबर महिन्यात कंपनीची वाहन विक्री १३ टक्क्यांनी कमी झाली आहे. कंपनीच्या भारतातील वाहन विक्रीतही यंदा घट नोंदली गेली आहे. कमी मागणीमुळे कंपनीने आपला जमशेदपूर येथील वाहन निर्मिती तीन दिवसांसाठी बंद ठेवली होती.
फोर्ड इंडियाने देशांतर्गत विक्रीत घट नोंदविली असली एकूण विक्रीत नोव्हेंबरमध्ये किरकोळ वाढ राखली आहे. टोयोटा किर्लोस्करची विक्री २६ टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीने नुतनीकरणासाठी या महिन्यात आठवडय़ासाठी प्रकल्प बंद      ठेवला होता. नव्या ब्राओ, सिटी या वाहनांमुळे जपानच्या होन्डा कंपनीने तब्बल ८७ टक्क्यांची वाहन वाढ नोंदविली आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्येही ४६ टक्क्यांनी अधिक वाहन विक्री राखली होती.

Story img Loader