सेबीने केलेल्या मुख्य प्रवर्तक व अध्यक्षांवरील कारवाईने डीएलएफचे समभाग मूल्य मंगळवारी भांडवली बाजारात तब्बल २८ टक्क्य़ांनी आपटले. यामुळे कंपनीचे भांडवलही एकाच दिवसात ७,५०० कोटी रुपयांनी रोडावले.
२००७ मध्ये सूचिबद्ध झालेल्या या कंपनीच्या समभाग मूल्याने व्यवहारात ३० टक्क्य़ांपर्यंत आपटत १०२.७० रुपयांच्या रुपाने इतिहासातील तळ नोंदविला. मुंबई शेअर बाजार दफ्तरी दिवसअखेर समभाग १०४.९५ रुपयांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात त्याला सोमवारच्या तुलनेत २७.९८ टक्के कमी भाव मिळत १०५.८० रुपयांपर्यंत खाली यावे लागले.  एकाच दिवसातील ७,४३८.६७ कोटी रुपयांच्या ओहोटीमुळे भांडवली बाजारात कंपनीचे एकूण मूल्य आता १८,७०१.३३ कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे. दोन्ही प्रमुख बाजारात मिळून ९ कोटी समभागांचे व्यवहार मंगळवारी झाले. सेबीच्या तीन वर्षे र्निबधामुळे कंपनी समभाग सोमवारी ४ टक्क्य़ांनी घसरला होता. ३० जून २०१४ अखेर डीएलएफवरील कर्जाची रक्कम १९,००० कोटी रुपये आहे. कंपनीने ३,५०० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. वार्षिक १०,००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या डीएलएफने २००७ मध्ये बाजारात प्रवेश घेताच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता. प्राथमिक खुल्या समभाग विक्रीतून कंपनीने ९,१८७ कोटी रुपये उभारले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा