गव्हर्नर राजन यांची नववर्ष संदेशात सहकाऱ्यांना साद

नववर्षांनिमित्त रिझव्‍‌र्ह बँकेतील कर्मचारी व सहकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या दीर्घ संदेशात, गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या बुडीत कर्जाबाबत कठोरतेची भूमिका घेतली जाण्याची हाक दिली. मध्यवर्ती बँकेला केवळ ‘कागदी वाघ’ ठरू नये यासाठी धनाढय़ व शक्तिशाली अपराधी मोकळे सुटणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

एका नियंत्रित व्यवस्थेतील कारभारात दिसणाऱ्या ढिसाळतेबाबत अधिक असहिष्णुतेची गरज व्यक्त करतानाच, यातून आगामी वर्षांत नव्या प्रकारच्या घोटाळे जन्माला येणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असेही राजन यांनी आवाहन केले.

एक ‘कमजोर व्यवस्था’ आपल्याबाबतीत हेटाळणीने होणारा उल्लेख नमूद करीत राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारभाराचेही आत्मपरीक्षण केले. ‘अपराधाला पायबंद घालू शकेल अशी आपल्याकडे प्रशासकीय क्षमता नाही, असा आपल्यावर आरोप आहे. अपराधी कमजोर व दुबळा आहे, हे पाहूनच कारवाईचा वार आपल्याकडून केला जातो,’ असे राजन यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या १६,८०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पाच पानी संदेशात म्हटले आहे.

आपण धनवान अथवा बडय़ा व्यावसायिकांच्या विरोधात आहोत असा यातून अर्थ काढला जाऊ नये तर गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या सर्वानाच शिक्षा दिली जावी, असे आपल्याला सूचित करावायचे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

देशातील अग्रणी आणि सर्वात प्रतिष्ठित नियामक संस्था म्हणून आपली अग्रगामी भूमिका आहे. आपल्याकडे प्रत्येक स्तरावर सचोटीने कार्यप्रवृत्त झालेला कर्मचारी वर्ग आहे. तरीही नियमपालनाची व्यवस्था आपण लागू करू शकत नाही, अशी आपल्याबद्दल धारणा बनली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडे कदापि एक ‘कागदी वाघ’ म्हणून पाहिले जाऊ नये.

गव्हर्नर रघुराम राजन