सलग १२ व्या महिन्यात वाढ
दसऱ्यासारखा मुहूर्ताचा दिवस असलेल्या व दिवाळीसारख्या सणांची चाहूल देणाऱ्या ऑक्टोबरमध्ये वाहनांची बाजारपेठ विक्रीबाबत फुलून गेली आहे. गेल्या महिन्यात प्रवासी कारच्या विक्रीत तब्बल २१.८ टक्के तर दुचाकी विक्रीत १३.३१ टक्के वाढ नोंदली गेली आहे. वार्षिक तुलनेत ऑक्टोबरमध्ये एकूण वाहन विक्री १३.९१ टक्क्यांनी वाढून २०,३५,८२१ झाली आहे.
गेल्या महिन्यात प्रवासी कार विक्री १,९४,१५८ झाली आहे. तर दुचाकी विक्री १६,५६,२३५ झाली आहे. एकूण प्रवासी वाहन विक्री २१.४६ टक्क्यांनी तर व्यापारी वाहने १२.७३ टक्क्यांनी वाढली आहेत. ऑक्टोबरमध्ये दुहेरी आकडय़ात वाहन विक्री नोंदविणाऱ्या या क्षेत्राने सलग १२ महिन्यांत विक्रीतील वाढ राखली आहे.
ऑक्टोबर २०१४ च्या तुलनेत देशातील एकूण वाहनांची निर्मिती १४.४० टक्क्यांनी वाढली असली तरी निर्यात मात्र ५.५६ टक्क्यांनी रोडावली आहे.
कमी मान्सून आणि एकूण ग्रामीण भागातील मागणी कमी असताना सणांच्या जोरावर यंदा वाहन विक्री वाढल्याचे वाहन उत्पादन क्षेत्रातील संघटना ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.
प्रवासी कारबरोबरच दुचाकी तसेच व्यापारी वाहनांमधील विक्रीतील वाढ यंदा लक्षणीय ठरली असल्याचेही ते म्हणाले. एकूण सणांचा लाभ या उद्योगावर येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत जाणवेल, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सणातील वाहन उद्योगातील वातावरण अधिक उत्साहाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात मारुती, ह्य़ुंदाईसह यापूर्वीच्या काही महिन्यांमध्ये विक्रीतील घसरण नोंदविणाऱ्या टाटा मोटर्स तसेच महिंद्र अॅन्ड महिंद्रने वाढ राखली होती.तर बजाज ऑटो वगळता इतर सर्व दुचाकी निर्मिती कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ नोंदली गेली होती. त्यातही मोटरसायकलच्या तुलनेत स्कूटरसाठी असलेली ग्राहकांची मागणी लक्षणीय नोंदली गेली.
सणांचा हंगाम वाहन विक्रीला लाभला
गेल्या महिन्यात प्रवासी कार विक्री १,९४,१५८ झाली आहे. तर दुचाकी विक्री १६,५६,२३५ झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 11-11-2015 at 00:35 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic car sales up by 22 in october