सत्रात २०,००० ला
दोनदा स्पर्श; व्यवहारांती तेजीसह माघार
सव्वा टक्क्याची झेप घेत आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दोन वर्षांच्या उच्चांकाला नेऊन ठेवणाऱ्या ‘सेन्सेक्स’ने सलग दुसऱ्या सत्रात तेजी राखताना मंगळवारच्या व्यवहारात दोन वेळा २० हजाराच्या अनोख्या टप्प्याला स्पर्श केला. दिवसअखेर मुंबई निर्देशांकाने ८०.४१ अंशांची वाढ नोंदविली असली तरी या उंचीपासून माघारी, १९,९८६.८२ वर स्थिरावला. ६ जानेवारी २०११ नंतर प्रमुख निर्देशांकाने हा टप्पा प्रथमच गाठला होता.
कालच्या व्यवहारात भांडवली बाजाराने ‘गार’ दोन वर्षे लांबणीवर टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तर व्यवहारांती पहिल्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएसचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर झाले. टाटा समूहातील १० अब्ज डॉलरच्या या कंपनीचा परिणाम आज दिसून आला.
सकाळच्या सत्रातच निर्देशांक १०० अंश वाढीने २०,००७.०९ ला स्पर्श करता झाला. माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपनी समभागांच्या जोरावर ‘सेन्सेक्स’ने तब्बल दोन वर्षांनंतर हा टप्पा अनुभवला होता. ‘निफ्टी’ही यावेळी अवघ्या ३.३५ अंश वाढीसह मात्र ६,००० च्या वर, ६,०२७.४० प्रवास करत होता. राष्ट्रीय शेअर बाजारही दिवसअखेर ३२.५५ अंश वाढीसह ६,००० च्या वरच्या स्तरावर राहिला.
दरम्यान, सकाळच्या सत्रात परकी चलन व्यवहारात रुपयाही १५ पैशांनी वधारला होता. दिवसअखेर तो १२ पैशांनी घसरत ५४.६१ वर आला. रुपयाने कालच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २७ पैशांची वाढ नोंदविताना आठवडय़ाच्या उच्चांकाला गाठले होते.
आयटीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, ओएनजीसी यांच्या जोरावर बाजारातील तेजी कायम होती. तर इन्फोसिस, कोल इंडिया, स्टेट बँक, महिंद्र अॅण्ड महिंद्रूसारख्या कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे ‘सेन्सेक्स’ला २० हजाराच्या टप्प्यापासून माघार घ्यावी लागली.
बाजारात आज ज्याप्रमाणे ‘गार’च्या निर्णयाचे स्वागत झाले तसेच व्याजदराशी निगडित कंपन्यांच्या समभागांनीही हालचाल नोंदविली. रिझव्र्ह बँकेला अपेक्षित असलेला महागाई दर खालच्या पातळीवर विसावल्याने बांधकाम आणि बँक समभाग आज उंचावले. हे दोन्ही क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे १.०५ व ०.७२ टक्क्यांनी वधारले होते. व्याजदर कपातीबाबत मध्यवर्ती बँक येत्या २९ जानेवारी रोजी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा