‘आयपीओ’ बाजाराला नवसंजीवनी
भांडवली बाजारात सूचिबद्ध होताना आरोग्यनिगा क्षेत्रातील दोन कंपन्यांनी बुधवारी पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी बजावली. औषध उत्पादक अल्केम लॅबोरेटरीजचा समभाग बुधवारच्या व्यवहारात ३४.२८ टक्क्यांपर्यंत झेपावला. तर आरोग्यनिदान क्षेत्रातील चिकित्सालयांची साखळी असलेल्या डॉ. लाल पॅथलॅब्सच्या समभागाने पहिल्याच व्यवहारात तब्बल ५३.१६ पर्यंत उडी घेतली.
अल्केमच्या समभागाला दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात ३१.५६ टक्के अधिक भाव मिळत तो १,३८१.४५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे बाजार भांडवल यामुळे पहिल्या दिवसअखेर १६,५१७.३१ कोटी रुपयांवर गेले. प्रारंभिक खुल्या भागविक्री (आयपीओ) दरम्यान प्रत्येकी १,०५० रुपये किंमतीला हा समभाग मिळविणाऱ्या भाग्यवान गुंतवणूकदारांना अवघ्या काही दिवसांत मोठा लाभ पदरी पाडता आला असून, बाजारात असा मोठय़ा कालावधीनंतर दिसला आहे. कंपनीच्या भागविक्रीला ४४.२९ पट प्रतिसाद मिळाला होता.
डॉ. लाल पॅथलॅबच्याा प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेला ३३.४१ पट प्रतिसाद मिळाला होता. प्रत्येकी ५५० रुपये किमतीला वितरीत झालेल्या या समभागाने गुंतलेले मूल्य पहिल्याच व्यवहारात ५० टक्क्य़ाने वाढण्याचे भाग्य गुंतवणूकदारांच्या पदरी टाकले आहे. बुधवारअखेर ४९.८४ टक्के अधिक भाव मिळत हा समभाग ८२४.१५ रुपयांवर स्थिरावला. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल ६,८११.१७ कोटी रुपयांवर गेले.
अल्केम, डॉ. लाल पॅथलॅबपूर्वी बाजारात २०१५ मध्ये एस. एच. केळकर, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, पॉवर मेक प्रोजेक्ट्स व सिन्जिन इंटरनॅशनल यांनी भागविक्रींना मोठा प्रतिसाद मिळवित बाजारात उमदे पदार्पण केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा